कोणार्कनगर : महामार्गावरील डिलक्स टायर्स ते गणेश मार्केटपर्यंतचा मुख्य रस्ता बनला मृत्यूचा सापळा
By Admin | Updated: April 26, 2015 22:44 IST2015-04-26T22:29:00+5:302015-04-26T22:44:13+5:30
मेनरोड अरुंद, कॉलनी रस्ते ओबडधोबड

कोणार्कनगर : महामार्गावरील डिलक्स टायर्स ते गणेश मार्केटपर्यंतचा मुख्य रस्ता बनला मृत्यूचा सापळा
कोणार्कनगर क्रमांक १ आणि २, आडगाव परिसर : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील कोणार्कनगर वसाहत २५ वर्षांपूर्वी विकसित झाली; परंतु सुरुवातीला झालेल्या रस्त्यांचे रिसर्फेसिंग न झाल्याने कॉलनी रस्त्यांची दैना झाली आहे. याशिवाय गणेश मार्केटपासून महामार्गाला जोडणारा मुख्य रस्ता अरुंद असून, या मार्गावर नेहमी अवजड वाहतूक होत असल्याने तो मृत्यूचा सापळा बनल्याची तक्रार नागरिकांनी ‘लोकमत टीम’पुढे मांडली.
पंचवटी, आडगाव परिसरातील कोणार्कनगर क्रमांक एक आणि दोन, ज्ञानेश्वरनगर, श्रीरामनगर परिसर विकसित होत असून, त्या तुलनेत मूलभूत सोयी-सुविधा पुरविल्या जात नसल्याची कैफियत नागरिकांनी मांडली. कोणार्कनगर क्रमांक १ मध्ये सुमारे ६५ बंगल्यांची वसाहत आहे. १९९० सालापासून विकसित होत असलेल्या या वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. रस्त्यांना ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. कॉलनीतील काही रस्ते मधूनच कच्चे सोडण्यात आले आहेत. त्यांचे डांबरीकरण झालेले नाही. निधीअभावी काम रखडल्याचे सांगितले जाते. मुख्य रस्ता अरुंद असून, याठिकाणी भरधाव वेगाने वाहने धावत असतात. त्यामुळे दोघांचे बळी गेले आहेत. सदर रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली. परिसरात स्वच्छतेबाबतही दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.