दिंड्यांनाही नोटाबंदीचा फटका
By Admin | Updated: January 21, 2017 00:07 IST2017-01-21T00:06:11+5:302017-01-21T00:07:24+5:30
संत निवृत्तिनाथ यात्रा : वारकऱ्यांची संख्या यंदा निम्म्याने घटली

दिंड्यांनाही नोटाबंदीचा फटका
भाग्यश्री मुळे : नाशिक
वाढती थंडी, नोटाबंदीमुळे आर्थिक चणचण, अपुरी शेतीची कामे आदि विविध कारणांमुळे यंदा त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तिनाथ यात्रेला येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या निम्म्याने घटली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने वारकरी असणाऱ्या दिंड्या यावर्षी छोट्या झाल्याचे दिसून येत आहे. आर्थिक घडी सुरळीत झाल्यानंतर यावर्षी नाही, तर पुढील वर्षी दिंडीबरोबर यात्रेला जाऊ, असा पवित्रा घेत बहुतांशी वारकऱ्यांनी यंदा घरीच राहणे पसंत केले आहे. नाशिकमध्ये दाखल झालेल्या दिंड्यांशी संवाद साधला असता त्यातील वारकऱ्यांनीही या गोष्टीशी सहमती दर्शविली. नोव्हेंबरमध्ये मोदी सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर गत अडीच महिन्यांपासून देशातील आर्थिक घडी विस्कळीत झाली असून, सर्वच क्षेत्रांमध्ये त्याचा परिणाम दिसून येत आहे. दरवर्षी शेतीची कामे मार्गी लावून श्रद्धेने संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दिंडीद्वारे श्रद्धेने पायी त्र्यंबकनगरीला येत असतात. आबालवृद्धांचा त्यात सक्रिय सहभाग असतो. यंदा दिंड्यांमधील वारकऱ्यांची संख्या रोडावल्याचे चित्र दिसून येत आहे. त्या कारणांचा शोध घेतला असता नोटाबंदीनंतर प्रामुख्याने शेतीकामावर अवलंबून असणाऱ्या वारकऱ्यांना पैशांची जाणवत असलेली चणचण, रेंगाळलेली शेतीकामे आणि वाढती थंडी या गोष्टी समोर आल्या. आर्थिक संकटात सापडल्याने वारकऱ्यांनाही यंदा माउलींच्या सेवेऐवजी कुटुंबाची आर्थिक घडी बसवण्याला प्राधान्य द्यावे लागत असल्याचे दिसून येत आहे. दिंड्यांबरोबरच त्र्यंबकेश्वरी भरणाऱ्या यात्रेलाही आर्थिक फटका बसतो की काय, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.