घरकुलांच्या चाव्या हातात; बिऱ्हाड मात्र झोपडीतच!
By Admin | Updated: November 2, 2015 22:15 IST2015-11-02T22:13:38+5:302015-11-02T22:15:00+5:30
स्थलांतराकडे पाठ : तीनशेपैकी दोनशे लाभार्थ्यांचे वास्तव्य

घरकुलांच्या चाव्या हातात; बिऱ्हाड मात्र झोपडीतच!
नाशिक : ‘नंदिनी’च्या काठावर शिवाजीवाडी येथे झोपडपट्टीधारकांना हक्काची चांगली घरे उपलब्ध व्हावी, या हेतूने एकूण नऊ इमारतींचा घरकुल प्रकल्प महापालिकेकडून उभारण्यात आला आहे. कल्याण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर प्रचार सभेत नाशिकची ‘विकासकामे’ दाखवून कल्याण-डोंबिवलीमध्ये जर सत्ता दिली, तर अशाच प्रकारे ‘स्मार्ट’ शहर घडवून दाखवेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी ठाकरे यांनी आवर्जून घरकुल वाटपाचाही नामोल्लेख करत तीनशे कुटुंबीयांना चाव्या दिल्या असून, सर्व कुटुंबे तेथे राहायलादेखील गेली आहेत, असे मोठ्या अभिमानाने सांगितले; मात्र तीनशे कुटुंबांच्या हातात चाव्या पडल्या असल्या, तरीदेखील अवघी दोनशे कुटुंबे प्रत्यक्षात घरकुलांमध्ये वास्तव्यास आहेत. उर्वरित कुटुंबांनी स्थलांतराकडे पाठ फिरविल्याने लाभार्थ्यांना घरकुलांची नाही, तर घरकुलांना लाभार्थ्यांची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे!