किसान क्रांती मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक
By Admin | Updated: May 13, 2017 00:25 IST2017-05-13T00:24:41+5:302017-05-13T00:25:02+5:30
नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी किसान क्रांती मोर्चातील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिली.

किसान क्रांती मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे केंद्र व राज्य सरकारने सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी किसान क्रांती मोर्चातील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिली. शासनाने गांभीर्याने प्रश्न न सोडविल्यास एक जूनपासून शेतकरी संपावर जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांच्या नेतृत्वाखाली दुपारी शहरातील बी. डी. भालेकर येथून शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलिसांनी अडवला. अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे पीक कर्ज, वाढत्या आत्महत्या या साऱ्या विषयांशी संलग्न फलक हातात घेतलेल्या शेतकऱ्यांकडून सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. शासनाने या मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा एक जूनपासून शेतकरी संपावर जातील, असा इशाराही देण्यात आला.
या मोर्चात बाळासाहेब गुजर, बाळासाहेब पुंड, सुभाष जाधव, अनिल सोनवणे, दशरथ सांगळे, नामदेव डांगळे, प्रमोद गायकवाड, बाळासाहेब निंबाळकर, लहानू मेमाने, शशिकांत आवारे, शशिकला अडसरे, रामदास वाढवणे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
जिल्हा बॅँकेचे अधिग्रहण करावे
शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांचीच भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, ज्या शेतकऱ्यांचे जिल्हा बॅँकेत खाते आहेत त्यांच्या खात्यावरील रक्कम राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्ये वर्ग करण्यात यावे, राष्ट्रीयीकृत बॅँकेत जिल्हा बॅँकेचे अधिग्रहण करण्यात यावे, शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बॅँकांनी कर्जपुरवठा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, बाजार समित्यांकडून शेतकऱ्यांना विकलेल्या मालाचे पैसे त्वरित दिले जावेत, ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, अखंडित वीजपुरवठा करावा, खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.