वीस लाखांच्या खंडणीसाठी नाशकातील युवकाची हत्त्या

By Admin | Updated: October 18, 2015 00:08 IST2015-10-18T00:07:14+5:302015-10-18T00:08:56+5:30

मालेगाववर शोककळा : त्र्यंबकेश्वरजवळ आढळला मृतदेह

Killer youth killed for ransom of 20 lakhs | वीस लाखांच्या खंडणीसाठी नाशकातील युवकाची हत्त्या

वीस लाखांच्या खंडणीसाठी नाशकातील युवकाची हत्त्या

मालेगाव/नाशिक : शिक्षणासाठी गोळे कॉलनीत राहात असलेल्या मालेगावमधील व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाचे २० लाख रुपयांंच्या खंडणीसाठी अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे़ खून झालेल्या युवकाचे नाव मोहितेश प्रलिन बाविस्कर (१७) असे असून, तो मूळचा मोतीबाग नाका, कलेक्टरपट्टा, मालेगाव येथील रहिवासी आहे़ या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे़
मालेगावमधील व्यावसायिक प्रलिन श्यामकांत बाविस्कर यांचा सतरा वर्षीय मुलगा मोहितेश प्रलिन बाविस्कर हा आयआयटी परीक्षेच्या क्लाससाठी नाशिकमधील गोळे कॉलनीतील वसतिगृहात मित्रांसमवेत राहात होता़ बुधवारी (दि़ १४) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्याचे अपहरण केले़ तर गुरुवारी (दि़ १५) त्याच्या मोबाइलवरून (८८८८७०२७७०) वडील प्रलिन बाविस्कर यांच्या मोबाइलवर (९८२३१८४४८५) फोन करून अज्ञात व्यक्तीने २० लाखांच्या खंडणीची मागणी करून रक्कम न दिल्यास मोहितेशला जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ यानंतर वडील प्रलिन बाविस्कर यांनी गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून मुलाचे खंडणीसाठी अपहरण झाल्याची फिर्याद दिली़
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरम्यान, मयत मोहितेशचे मित्र-मैत्रिणी, त्याचे कुणाशी वैर, भांडण होते का? याचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

शुक्रवारी (दि़ १६) त्र्यंबकेश्वर-जव्हार रोडवरील एका शेताच्या मोरीजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह मिळाल्याची माहिती डी़ आऱ पाटील यांना मिळाली़ त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी तो रुग्णालयात पाठविला़ अज्ञात मृतदेहाची चौकशी करण्यासाठी बाविस्कर कुटुंबीयांचे सदस्य गेले असता सदर मृतदेह मोहितेश याचा असल्याचे त्यांनी ओळखले़ घटनेचे वृत्त मालेगाव शहरात समजताच शहर हादरले. मोहितच्या नातलगांनी नाशिककडे धाव घेतली. त्याच्या कलेक्टर पट्टा भागासमोरील घरात कल्लोळ माजला होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्याचा मृतदेह मालेगावी आणण्यात आला. तेव्हा आईसह नातलगांनी मोठा हंबरडा फोडला. यावेळी सर्वांचे डोळे पाणावले होते. मोहितेशवर सायंकाळी श्रीरामनगर अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Killer youth killed for ransom of 20 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.