अपहरण करणाऱ्या टोळीला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:15 IST2021-01-22T04:15:13+5:302021-01-22T04:15:13+5:30
नाशिकरोड परिसरात राहणाऱ्या बांधकाम व्यवसाय करणाऱ्या बबन शिंदे व प्रवीण विभांडीक यांनी काही दिवसांपूर्वी चौधरी याच्याकडून बांधकाम व्यवसायासाठी ४० ...

अपहरण करणाऱ्या टोळीला पोलीस कोठडी
नाशिकरोड परिसरात राहणाऱ्या बांधकाम व्यवसाय करणाऱ्या बबन शिंदे व प्रवीण विभांडीक यांनी काही दिवसांपूर्वी चौधरी याच्याकडून बांधकाम व्यवसायासाठी ४० लाख रुपये घेतलेले होते. त्या बदल्यात काही रक्कम व जागा नावावर करून दिली होती. गेल्या रविवारी चौधरीने शिंदे व विभांडीक यांना जेलरोड येथे भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर त्यांना आडगाव येथे एका हॉटेलमध्ये बोलावले. तेथे बेदम मारहाण करून शिंदे यांच्या अंगावर लघुशंका करत पैसे परत दे नाहीतर बघून घेईन, अशी धमकी देत एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून गंगावाडीत नेत दोघांना मारहाण करत विभांडीकला बंदूक लावून धमकी दिली होती व त्यानंतर दोघांना सोडून दिले होते.
या घटनेनंतर शिंदे व विभांडीक यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत झाल्याप्रकाराची माहिती दिली. त्यानुसार चौधरीसह इतर सहा ते सात संशयितांवर गुन्हा दाखल केला होता. काल वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित आबा चौधरी, ऋतिक दत्तू लोहकरे, अमृत धनंजय इखंकर, ऋतिक सावाई भालेराव या चौघांना ताब्यात घेतले होते. गुरुवारी सर्व संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. या संशयितांविरुध्द प्राणघातक हल्ला, अनुसूचित जाती-जमाती कायद्यान्वये (ॲट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस आयुक्तांकडे वर्ग केला आहे.