खरीप अनुदानासाठी जिल्हा बॅँकेला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2016 00:48 IST2016-06-28T00:44:40+5:302016-06-28T00:48:18+5:30
नामपूर : १२ महिने उलटूनही मदत नाही

खरीप अनुदानासाठी जिल्हा बॅँकेला घेराव
नामपूर : मागील वर्षी खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी राज्य सरकारने कोरड बागायत व फळ पीक अशी वर्गवारी करून मदतीचा हात जाहीर केला. परंतु तब्बल १२ महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या हातात मदत न मिळाल्याने येथील ग्राहक समितीच्या वतीने सोमवारी दुपारी जिल्हा बॅँकेच्या शाखेला घेराव घालण्यात आला.
मागील आठवड्यात बागलाण तालुक्यास १९ कोटी रूपये तहसील कार्यालयास प्राप्त झाले आहेत. परंतु या रकमा अजुन बँकांनी वितरित न केल्यामुळे सर्वत्र नाराजी पसरली आहे. या नाराजीतूनच सोमवारी नामपुर शहर ग्राहक समितीच्या वतीने जिल्हा बँकेच्या झेंडा चौक शाखेला घेराव घालण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी राजेंद्र भामरे, बॅँक निरीक्षक हेमंत भामरे शाखा व्यवस्थापक रविंद्र दाणी हजर होते. याबाबत त्वरित कार्यवाही करु न पैसे प्राप्त झाल्यास तत्काळ वितरित करू अशी हमी संबधित अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे निवेदन देऊन घेराव मागे घेण्यात आला.
नामपुर भागातील बँकांचा मागील अनुभव लक्षात घेता अनुदानाचे पैसे देण्यास टाळाटाळ करतात किंवा विलंब लावतात ही बाब चुकीची असून यापुढे असा अन्याय झाल्यास तीव्र लढा देऊ असे मत नागरिकांनी व्यक्त केले.
याप्रसंगी ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष शामकात लोखंडे, शहर अध्यक्ष विनोद पाटील, सभापती जीजाबाई सोनवणे, सरपंच भाऊसाहेब सावंत, खेमराज कोर, सोमनाथ सोनवणे, दामू नंदाले, पोपट वाघ सुनील निकुंभ, अरुण भामरे सह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)