पावसाअभावी खरीप धोक्यात
By Admin | Updated: July 18, 2014 00:35 IST2014-07-17T22:44:39+5:302014-07-18T00:35:16+5:30
पावसाअभावी खरीप धोक्यात

पावसाअभावी खरीप धोक्यात
नायगाव : सलग चौथ्या वर्षीही पावसाने पाठ फिरवल्याने यंदाही खरीप हंगाम धोक्यात आला असून, पाणी, चाराटंचाईने बळी राजा हवालदिल झाला आहे. आषाढ महिन्यात पेरण्या होऊ न शकल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे.
वाढती महागाई, सर्वच जलस्रोत कोरडेठाक पडल्याने निर्माण झालेली पाणीटंचाई, चारा मिळणेही दुरापास्त झाल्याने पशुधन कसे वाचवायचे या विवंचनेत बळीराजा सापडला आहे. जुलै महिना अर्ध्यावर आला तरीही पाऊस होत नसल्याने अनेक पिकांची पेरणी यापुढे अशक्य झाल्याने यंदा बळी राजाच्या हातात खरीप हंगामातील पिके लागणार नसल्याचे चिन्ह दिसू लागली आहेत. नायगाव खोऱ्यासह सिन्नर तालुक्यावर गेल्या चार वर्षांपासून पावसाने अवकृपा केल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यंदाही अद्यापही पावसाने हुलकावणी दिल्याने परिस्थिती कमालीची बिकट बनली आहे. पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पाण्याची पातळी खोलवर जात आहे. परिसरातील सर्वच गावांना व वाड्यावस्त्यांना पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांपैकी जून व जुलै हे दोन महिने खरिपासाठी महत्त्वाचे असून, तेही कोरडे गेल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. सर्वच लागवडीयोग्य क्षेत्र सध्या रिकामे असल्यामुळे शेतकऱ्यांबरोबर मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्यांची स्थिती बिकट बनली असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. जून महिन्यापासून अधूनमधून निर्माण होणारे पावसाचे वातावरण आजही तयार होत, मात्र आभाळात जमा होणारे काळे ढग जमिनीच्या दिशेने जाण्याऐवजी जोरदार वाऱ्यामुळे वरच्यावरच विरळून जात आहेत. त्यामुळे आभाळमाया बरसत नसल्याने हवामान खात्याचे अंदाजही खरे ठरत नसल्याने पावसाचे काम राम भरोसे बनले आहे. अशा परिस्थितीतही आज ना उद्या पडेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील भाजीपाल्याची रोपे तयार केली आहे. ती रोपे आता लागवडीसाठी तयार झाली आहेत. मात्र पाण्याअभावी ही रोपे इतरत्र विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर असलेली रोपे घेण्यास कोणीही धजावत नसल्याने रोपे घ्या रोपे असे म्हणण्याची वेळ आली
आहे. सध्या वातावरणात बदल घडत असताना केव्हा दमट हवामान निर्माण होऊन ढगांची गर्दी होते काही वेळा थंडगार वाऱ्याची झुळूक येऊन वातावरणात थंडीची चाहूल लागते. भरदुपारी तर उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे. (वार्ताहर)