सातारे येथे खंडेराव महाराज यात्रोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 18:54 IST2019-04-13T18:53:56+5:302019-04-13T18:54:44+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील सातारे येथे खंडेराव महाराज यात्रोत्सवाची बारागाड्या ओढून उत्साहात सांगता करण्यात आली.

सातारे येथे खंडेराव महाराज यात्रोत्सवाची सांगता
यंदाच्या वर्षी या यात्रेला सोळा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सकाळी १० ते १ वाजेपर्यंत गावातून अश्वासोबत काठी मिरवणूक काढण्यात आली. खंडेराव महाराज भक्तांनी भंडारा उधळीत व वाद्याच्या तालावर ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ चा गजर करीत भर उन्हात ठेका धरला होता. खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त गावात सात दिवस जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जागरण गोंधळात खंडेराव भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावर्षी बारागाड्या ओढण्याचा मान रमेश पठारे यांना मिळाला होता. सात दिवस रोज रात्री ९ ते २ या वेळेत अनेक वाघे मंडळींनी या जागरण गोंधळासाठी हजेरी लावली होती. पठारे यांनी बारागाड्या ओढल्यानंतर रात्रभर रहाडी जागरण करण्यात आले. त्यानंतर लंगर तोडून उत्सवाची सांगता झाली. यात्रोत्सवात दत्तात्रय दखने, ज्ञानेश्वर गचाले, अनिल पानसरे, कृष्णा गांगुर्डे, शरद मखरे, जालिंदर साठे, गणपत शेळके, सुरेश झाल्टे, गणेश पतंगराव, तुकाराम गवारे, गोकुळ साठे, रमेश पठारे, रामदास सोमवंशी, अनिल मखरे, राजेंद्र मखरे, दिपक मखरे आदींसह गावकरी बहुसंख्येने सहभागी झाले होते.