माघारीसाठी ‘खल’बते सुरूच
By Admin | Updated: November 12, 2014 23:46 IST2014-11-12T23:45:24+5:302014-11-12T23:46:02+5:30
स्थायी समिती सदस्य निवडणूक : विशेष बैठकीची प्रतीक्षा

माघारीसाठी ‘खल’बते सुरूच
नाशिक : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या दोन सदस्यांच्या रिक्त पदांची निवड करण्यासाठी आता आठवडा उलटूनही अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांना स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांच्या रिक्त पदांसाठी निवडणूक घेण्यासाठी विशेष बैठकीची तारीख जाहीर करू शकलेल्या नाहीत.
दरम्यान, बुधवारीही (दि.१२) स्थायी समिती सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भाजपा सदस्य मनीषा बोडके यांचे पती श्याम बोडके यांच्याशी शिक्षण व आरोग्य सभापती किरण थोरे यांचे पती पंढरीनाथ थोरे यांनी बंद दाराआड चर्चा केली.
विशेष म्हणजे या चर्चेस शिवसेना गटनेते प्रवीण जाधव, राष्ट्रवादीचे सदस्य गोरख बोडके हेही उपस्थित होते. थोरे-बोडके यांच्या चर्चेचा रोख मनीषा बोडके यांच्या माघारीवरच असल्याचे समजते. प्रत्यक्षात काय चर्चा झाली, हे सांगण्यास कोणीही नकार दिला, तर निवडणूक बिनविरोध झाली नाही, तर आपणही माघार घेणार नाही, असा पावित्रा राष्ट्रवादीच्या सदस्य संगीता राजेंद्र ढगे यांनी घेतल्याने स्थायी समितीच्या दोन जागांच्या निवडीचा घोळ आणखीनच वाढला आहे.
विशेष म्हणजे विषय समिती वाटप व सदस्य निवडीसाठी बोलविण्यात आलेल्या विशेष सभेत अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी स्थायी समितीच्या दोन जागांसह उर्वरित विषय समित्यांच्या २० जागांसाठी एकूण ४२ अर्ज दाखल झाल्याने अध्यक्ष विजयश्री चुंबळे व उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांना ही विशेष सभा विषय समित्यांचे वाटप झाल्यानंतर अन्य विषय समित्यांच्या रिक्त जागांची निवड न करताच तहकूब करण्याची नामुष्की आली होती. आता आठवडा उलटूनही स्थायी समितीच्या दोन रिक्त जागांसाठी एकमत होत नसल्याने विशेष सभेची तारीख जाहीर झालेली नाही. (प्रतिनिधी)