भल्या पहाटे गर्भवतीच्या मदतीला धावली ‘खाकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST2021-01-08T04:43:47+5:302021-01-08T04:43:47+5:30

सोमवारी पहाटेच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्याचे पीटर मोबाइल नेहमीप्रमाणे रात्रगस्तीवर होते. यावेळी पहाटेच्या तीन वाजेच्या सुमारास एक वृद्ध दाम्पत्य ...

'Khaki' rushes to help pregnant woman | भल्या पहाटे गर्भवतीच्या मदतीला धावली ‘खाकी’

भल्या पहाटे गर्भवतीच्या मदतीला धावली ‘खाकी’

सोमवारी पहाटेच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्याचे पीटर मोबाइल नेहमीप्रमाणे रात्रगस्तीवर होते. यावेळी पहाटेच्या तीन वाजेच्या सुमारास एक वृद्ध दाम्पत्य एका गर्भवती महिलेसोबत पायी जात असल्याचे गस्तिपथकाच्या लक्षात आले. त्यामुळे तत्काळ सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला बिनतारी संदेश यंत्राद्वारे माहिती दिली, तसेच अतिरिक्त मदत म्हणून गुन्हे शोध पथकाच्या वाहनालाही तत्काळ पाचारण केले. पोलीस नाइक गिरिश महाले, राहुल सोळसे यांच्या मदतीने त्वरित गुन्हे शोध पथकाच्या वाहनात गर्भवती महिला भारती जाधव (२३) आणि त्यांचे सासु-सासरे यांना तत्काळ वाहनचालक दत्तात्रय उगले यांनी गिरणारे रुग्णालयात अगदी कमी वेळेत दाखल केले. वेळेवर गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचविल्यामुळे प्रसूती कळांपासून होणाऱ्या वेदनांपासून जाधव यांना मोठा आधार मिळाला. पहाटेची वेळ असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे वाहन गंगापूर गावापासून उपलब्ध होत नसल्याने, ते वृद्ध सासू-सासरे हे आपल्या सुनेला पायीच घेऊन रस्त्यावर आले होते आणि योगायोग असा की, रात्रीच्या गस्तिपथकाचे याकडे लक्ष वेधले गेले आणि एखाद्या देवदूताप्रमाणेच त्यांनी या महिलेच्या मदतीला धावून जात मानवी संवेदना पोलीस दलात जागृत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले.

---इन्फो--

गोंडस कन्येला दिला जन्म

गिरणारे ग्रामीण रुग्णालयात जाधव यांची यशस्वीरीत्या प्रसूती झाली. त्यांनी एका गोंडस कन्येला जन्म दिला. त्यांच्या सासू-सासऱ्यांनी पोलिसांना वेळीच मदत केल्यामुळे धन्यवाद दिले. पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अंचल मुदगल यांनी या गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्रक देणार असल्याचे सांगितले. गंगापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दाखविलेल्या मानवी संवेदना आणि केलेली मदत नक्कीच इतरांनाही प्रेरणा देऊन जाणारी आहे, असे मुदगल म्हणाले.

Web Title: 'Khaki' rushes to help pregnant woman