कामवाटपावरून पुन्हा ‘खडाजंगी’
By Admin | Updated: August 2, 2016 01:30 IST2016-08-02T01:27:51+5:302016-08-02T01:30:41+5:30
येवला-नाशिकच्या कामांना स्थगिती; कामांचे डबल वाटप

कामवाटपावरून पुन्हा ‘खडाजंगी’
नाशिक : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा आणि कामवाटप समितीचा सावळा गोंधळ सुरूच असून, प्रकरण विभागीय आयुक्तांपर्यंत गेलेले असतानाही सोमवारी (दि.१) कामवाटप समितीची बैठक झाली. बैठकीत अपेक्षेनुसार वाद होऊन ४२ पैकी निम्म्याहून अधिक कामांना वाटपावाचून स्थगित करण्याची नामुष्की विभागावर ओढवली.
कामवाटप समितीचे अध्यक्ष अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांच्या उपस्थितीत ही कामवाटप समितीची बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे कोषाध्यक्ष विनायक माळेकर यांनी बांधकाम विभाग एक अंतर्गत वाटप करावयाच्या १४ कामांवर आक्षेप घेतला. त्यांच्या म्हणण्यानुसार यातील चार कामे यापूर्वीच्याच १ जुलैच्या बैठकीत वाटप झालेली असताना तीच कामे पुन्हा वाटप करण्यासाठी का आली? अशी विचारणा त्यांनी केली. यावेळी मजूर संस्थेचे संचालक अशोक म्हस्के यांच्याशी त्यांची तू तू मैं मैं झाली. म्हस्के यांनी या चार कामांची प्रशासकीय मान्यता घेऊन पुन्हा ही कामे वाटपासाठी ठेवल्याचा माळेकर यांचा आरोप होता. अखेर नाशिक तालुक्यातील १४ कामे येत्या ८ आॅगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीत वाटप करण्याचे नियोजन ठरले. त्यातील दुसऱ्यांदा मंजुरीसाठी आलेली चार मोऱ्यांची कामे वगळण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
येवला व निफाड तालुक्यातील कामे परस्पर वाटप करण्यावर येवला व मजूर संस्थांच्या प्रतिनिधींनी विभागीय आयुक्तांकडे निवेदन देऊन तक्रार केली आहे. त्यानुसार ही कामे वाटप न करता स्थगित करण्यात आली. तसेच ८ आॅगस्टला नव्याने कामवाटप समितीची बैठक घेऊन त्यात या कामांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
वास्तविक पाहता मागील काम वाटपाच्या बैठकीतच सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना आणि मजूर सहकारी संस्था संचालक यांच्यात बाचाबाची झाली होती. त्याचे पडसाद सोमवारच्या बैठकीतही उमटले. (प्रतिनिधी)