दूध आटल्याने खवा महागला
By Admin | Updated: July 19, 2014 21:13 IST2014-07-18T22:19:18+5:302014-07-19T21:13:23+5:30
सध्या दुधाचे भाव ५० ते ६० रुपये प्रतिलिटर आहे. रमजान महिन्यात खव्याला वाढलेली मागणी व्यापारी पुरी करू शकत नसल्याने बाजारात खवा महागला आहे.

दूध आटल्याने खवा महागला
सुनील भास्कर ल्ल नाशिक
पावसाने उशीर केल्यामुळे चारा उत्पादन घटले. परिणामी जनावरांवर उपाशीपोटी रहावे लागत असल्याने दूध आटले. यामुळे दुधापासून तयार होणाऱ्या खव्याचे उत्पादनही घटले. सध्या दुधाचे भाव ५० ते ६० रुपये प्रतिलिटर आहे. रमजान महिन्यात खव्याला वाढलेली मागणी व्यापारी पुरी करू शकत नसल्याने बाजारात खवा महागला आहे. एरवी १६० ते १७० रुपये किलो भावाने मिळणारा खवा आता १८० ते २०० रुपये किलो या भावाने विकला जात आहे.
मुबलक पशुधन व चारा उपलब्ध असल्यामुळे कळवण आणि चांदवड ही दोन तालुके नाशिक शहरात खवा पाठविण्यात अग्रेसर आहेत. यंदाही जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने चाऱ्याचे उत्पादन घटले. जनावरांना चारा नसल्यामुळे तसेच पुरेसे पाणीही प्यायला नसल्यामुळे एकूण जनावरांच्या आरोग्याचाच प्रश्न निर्माण झाला. याचा परिणाम त्यांच्या दूध देण्यावर झाला. एरवी १० ते १५ लिटर दूध देणाऱ्या गायी-म्हशी पाच-सहा लिटर दूध देऊ लागल्या. पन्नास ते साठ लिटर दूध विकणारा दुग्ध व्यावसायिक पंधरा ते वीस लिटर दूध बाजारात आणू लागला. साहजिकच दूध बाजारात कमी पडू लागले. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला त्यातच रमजान महिना आला. रमजान महिन्यातील उपवासामुळे दुधाला मागणी वाढली आहे.