सफाई कामगारांचे पालिकेसमोर धरणे
By Admin | Updated: March 4, 2015 23:42 IST2015-03-04T23:42:00+5:302015-03-04T23:42:24+5:30
आऊटसोर्सिंगला विरोध : भरतीप्रक्रिया राबविण्याची मागणी

सफाई कामगारांचे पालिकेसमोर धरणे
नाशिक : शहरातील साफसफाई आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून करण्यास सफाई कामगारांनी तीव्र विरोध दर्शवित भरतीप्रक्रिया राबविण्याच्या मागणीसाठी महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले. यावेळी वाल्मीकी, मेघवाळ, मेहतर समाज संघर्ष समितीच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदनही देण्यात आले.
सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सफाई कामगारांसह वाल्मीकी, मेघवाळ आणि मेहतर समाजबांधवांनी महापालिकेसमोर घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व सुरेश दलोड, सुरेश मारू, महेशकुमार ढकोलिया, प्रवीण मारू, ताराचंद पवार, अनिल बेग, यशवंत बोरिचा आणि रमेश मकवाणा यांनी केले. आंदोलनात मोठ्या संख्येने सफाई कामगार सहभागी झाले होते. यावेळी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महापालिका साफसफाईचे काम ठेकेदारी पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पारंपरिक सफाईची कामे करणाऱ्या समाजावर अन्याय होणार आहे.
येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविक शहरात दाखल होणार असल्याने आणि महापालिकेकडे साफसफाईसाठी तुलनेत कमी कामगार असल्याने अडचणी उद्भवणार आहेत. महापालिकेने सफाई कामगारांची पदे मंजुरीचा प्रस्ताव पाठवूनही शासनाने सदरची कामे ठेकेदारी पद्धतीनेच करण्याचा घाट घातला आहे. महापालिकेने साफसफाई कामाचे आऊटसोर्सिंग न करता शासनाकडून नोकरभरतीसाठी परवानगी मिळवावी आणि वंशपरंपरेने सफाईची कामे करणाऱ्या समाजातील लोकांनाच भरतीत प्राधान्य द्यावे.
निवेदनात मुख्यमंत्री फडणवीस यांचाही निषेध करण्यात आला असून, लवकरात शासनाने मान्यता न दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. आयुक्तांनी याबाबत माहिती घेऊन लवकरच कार्यवाहीचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)