शेती अन् शेतकरी डोळ्यासमोर ठेवा

By Admin | Updated: April 12, 2015 00:50 IST2015-04-12T00:50:21+5:302015-04-12T00:50:45+5:30

शरद पवार यांचे मोदींवर टीकास्र : शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी लोकसभेत भांडणार

Keep agriculture and farmer in front of you | शेती अन् शेतकरी डोळ्यासमोर ठेवा

शेती अन् शेतकरी डोळ्यासमोर ठेवा

नाशिक : सर्वात कमी कालावधीत सर्वाधिक विदेशी दौरे करण्याचा विक्रम करणाऱ्या पंतप्रधानांनी परदेशात करार करताना शेती आणि शेतकरी डोळ्यासमोर ठेवून करार करावेत. कारण आताच्या सरकारचे शेतकरी आणि शेतीकडे साफ दुर्लक्ष झाल्याचा आरोप माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
नैसर्गिक संकटे येतच असतात. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे. नैसर्गिक आपत्तीसाठी एक स्वतंत्र समिती असते. या समितीचे मी गेल्या दहा वर्षांपासून अध्यक्ष होतो. आता या समितीचे कृषिमंत्री सदस्य असतात. आता राज्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, या बैठकांमध्ये या नुकसानभरपाईसाठी काही मदत करण्याचा निर्णय झाल्याचे आपल्याला अद्याप समजलेले नाही. आपण सांगितल्यानंतर कृषिमंत्री नाशिकला येऊन गेले. आताच्या राज्य व केंद्र सरकारचे शेती आणि शेतकरी या घटकांकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. राजनाथ सिंह आता या समितीचे अध्यक्ष आहेत. मात्र, या समितीने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची भूमिका घेतली आहे. नैसर्गिक आपत्तीसाठी बजेटमध्ये १० ते १२ हजार कोटींची तरतूद असते.  त्यातून नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत देता येते. मात्र, या सरकारने अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही. शेती आणि शेतकरी यांना या सरकारमध्ये दुय्यम स्थान आहे. आम्ही येत्या लोकसभा अधिवेशनात या प्रश्नावर सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करू. कारण आमच्याकडून शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत. मात्र, लोकशाहीत राज्यकर्ते निवडण्याचा अधिकार लोकांचा आहे, आम्हाला तसे अधिकार आता लोकांनी दिलेले नाही. मात्र, त्यांच्या प्रश्नावर भांडण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. नैसर्गिक आपत्ती ही दरवर्षी येतच राहते. ते नैसर्गिक संकट आहे. त्यातून शेतकऱ्यांना व जनतेला कशी मदत करायची, हे सरकारचे काम आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जाचे हप्ते सुलभ करून कर्जाचे पुनर्गठन केले पाहिजे. यांसह अनेक बाबी सरकारला करता येण्यासारख्या आहेत. मात्र, दुर्दैवाने सरकार गेल्या सात-आठ महिन्यांत ते करताना दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी करार करताना आणि सरकार चालविताना शेती आणि शेतकरी डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतले पाहिजेत, त्यासाठी आम्ही विरोधक म्हणून सातत्याने पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले. यावेळी माजीमंत्री आमदार छगन भुजबळ, समीर भुजबळ,विनायकराव पाटील,रवींद्र पगार आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)
इन्फो..

Web Title: Keep agriculture and farmer in front of you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.