केबीसीची जिल्ह्यातील ४० कोटींची मालमत्ता सील
By Admin | Updated: July 17, 2014 00:27 IST2014-07-17T00:10:37+5:302014-07-17T00:27:48+5:30
केबीसीची जिल्ह्यातील ४० कोटींची मालमत्ता सील

केबीसीची जिल्ह्यातील ४० कोटींची मालमत्ता सील
नाशिक : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या केबीसी कंपनीची सुमारे ४० कोटी रुपयांची मालमत्ता सील करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणे यांनी दिली़ दरम्यान, गुंतवणूकदारांची फ सवणूक टाळण्यासाठी नाशिक पोलिसांनी पुरेपूर प्रयत्न केल्याचा खुलासाही डहाणे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केला आहे़
केबीसी मल्टिट्रेड प्रा़ लि़ कंपनी बाबत निनावी अर्ज नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेस प्राप्त झाल्यानंतर सेबी व एनबीएफ सी यांना कळविण्यात आले होते़ पोलिसांनी २५ फे ब्रुवारीला गुंतवणूकदारांना तक्रार देण्याचे आवाहन केले होते़ मात्र तक्रारीसाठी कोणीही पुढे न आल्याने पोलिसांनी कंपनीविरुद्ध ८ मार्चला आडगाव पोलीस ठाण्यात द प्राईज चिट अॅण्ड मनी सर्क्युलेशन (बॅनिंग) अॅक्ट १९७८ कलम नंबर ३, ४, ५, ६ अन्वये गुन्हा दाखल करून कंपनीच्या कार्यालयातून चार कोटी ६६ लाख एक हजार ७८० रुपये जप्त केले होते़
कंपनीचे संचालक बापू चव्हाणला व संजय माळीचकर यांना अटकही करण्यात आली होती़ कंपनीचे मुख्य फ रार संचालक भाऊसाहेब व आरती चव्हाण यांच्याविरुद्ध लुक आऊट सर्क्युलर काढले. त्यानुसार १० जूनला या दोघांना अटकही झाली होती़ केबीसीचे संचालक, व्यवस्थापक यांच्या नावावर असलेल्या बँक खात्यातील २४ कोटीं रुपये सील करण्यात आले आहे़ याबरोबरच कंपनीच्या संचालकांच्या नावे असलेल्या पिंपळगाव मोर, घोटी येथील जमिनींबाबत कुठलाही खरेदी-विक्रीचा व्यवहार करू नये याबाबत जिल्हा सहनिबंधक यांना कळविण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे़ (प्रतिनिधी)