केबीसी संचालक, दलालांविरोधात २८९ पानी दोषारोपपत्र
By Admin | Updated: December 25, 2016 01:19 IST2016-12-25T01:18:49+5:302016-12-25T01:19:05+5:30
केबीसी संचालक, दलालांविरोधात २८९ पानी दोषारोपपत्र

केबीसी संचालक, दलालांविरोधात २८९ पानी दोषारोपपत्र
नाशिक : गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून राज्यातील लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारे केबीसीचे संचालक व दलालांविरोधात न्यायाधीश एस़आऱ शर्मा यांच्या न्यायालयात २८९ पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे़ या फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दहाही संशयितांविरोधात महाराष्ट्र ठेवीदार व गुंतवणूकदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल असून, त्यांनी २१२ कोटी १८ लाख ३९ हजार ९८० रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ केबीसीचा संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण, आरती भाऊसाहेब चव्हाण यांनी केबीसी मल्टिट्रेड कंपनीची स्थापना करून गुंतवणूकदारांना तिप्पट व्याजाचे आमिष दाखविले़ चव्हाणचे नातेवाईक तसेच दलालांनी गुंतवणूकदारांना आमिष दाखवून गुंतवणूक करून घेतली़ कालांतराने गुंतवणूकदारांना परतावा मिळत नसल्याने ११ जुलै २०१४ रोजी आडगाव पोलीस ठाण्यात संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलिसांत भाऊसाहेब व आरती चव्हाण हे सिंगापूरला फरार झाले़ पोलिसांनी कंपनीचे इतर संचालक बापूसाहेब छबू चव्हाण, पंकज राजाराम शिंदे, नितीन पोपटराव शिंदे, संजय वामनराव जगताप, नानासाहेब छबू चव्हाण, साधना बापू चव्हाण, भारती मंडलिक शिलेदार, कौशल्या संजय जगताप यांना अटक करून त्यांची मालमत्ता जप्त केली आहे़. दरम्यान, कंपनीचे प्रमुख संचालक भाऊसाहेब व आरती चव्हाण यांना मे २०१६ मध्ये मुंबई विमानतळावरून आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती़. केबीसी संचालकांविरोधात राज्यभरातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून, त्यासंदर्भात या दोघांची चौकशी करण्यात आली असून, सद्यस्थितीत ते कारागृहात आहेत़ तर आरती चव्हाणने प्रकृतीच्या कारणास्वत जामिनासाठी अर्ज केला असून, यावर जानेवारीमध्ये सुनावणी होणार आहे़ (प्रतिनिधी)