कावनईत ध्वजावतरण
By Admin | Updated: August 14, 2016 21:47 IST2016-08-14T21:46:58+5:302016-08-14T21:47:46+5:30
कुंभमेळा समाप्तीची घोषणा : जयकुमार रावल यांनी केले कपिलधाराचे पूजन

कावनईत ध्वजावतरण
घोटी : सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान समजल्या जाणाऱ्या कावनई येथील सिंहस्थ कुंभमेळापर्वाची आज मोठ्या थाटात सांगता झाली. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सपत्नीक या समारंभास उपस्थिती लावली, तर राज्यभरातून आलेल्या साधू-महंतांची या ध्वजावतरण समारंभास लक्षणीय उपस्थिती लाभली.
मागील वर्षी दि. १६ जुलै रोजी सर्व आखाड्यांच्या साधू-महंतांच्या उपस्थितीत कावनाई येथील कपिलधारा तीर्थावर मोठ्या थाटात सिंहस्थ कुंभमेळ्याचा आरंभ झाला होता. वर्षभरात लाखो भाविकांनी पर्वणीच्या काळात या ठिकाणी स्नानाचा लाभ घेतला.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे हे मूलस्थान असल्याने शासन, प्रशासन व ट्रस्टच्या वतीने गेले वर्षभर नियोजन करण्यात आले होते. दरम्यान, आज रविवारी या ठिकाणी कुंभमेळा समाप्तीचे ध्वजावतरण होणार असल्याने सकाळपासून पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. दुपारी बारा वाजेच्या सुमारास राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचे आगमन होताच त्यांच्यासह साधू-महंतांची तीर्थाच्या प्रवेशद्वारापासून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक कुंभमेळ्याच्या ठिकाणी येताच विधिवत धार्मिक पूजनाने व गंगा पूजनाने व विधिवत ध्वजावतरण करून येथील कुंभमेळा समाप्तीची घोषणा करण्यात आली.
यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह खासदार हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित व योगेश घोलप, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, जि. प. सदस्य गोरख बोडके, पंचायत समिती उपसभापती पांडुरंग वारुंगसे, ज्ञानेश्वर लहाने, जनार्दन माळी, पांडुरंग शिंदे, कचरू डुकरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष अण्णा डोंगरे, महेश श्रीश्रीमाळ, अशोक मुनोत, संजय सोनकांबळे यांच्यासह महंत चरणदास महाराज, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर आदिंसह ट्रस्टचे कुलदीप चौधरी, ज्ञानेश्वर झेंडे, पर्यटन विभागाचे प्रज्ञा बढे-मिसाळ, प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे, तहसीलदार अनिल पुरे आदि मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी घोटीचे पोलीस उपनिरीक्षक कमलेश बच्छाव, हवालदार संदीप झाल्टे, गणेश सोनवणे, कृष्णा कोकाटे, जगताप आदिंनी बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)