कथक नृत्याविष्काराचे अर्घ्य
By Admin | Updated: November 9, 2015 23:45 IST2015-11-09T23:44:26+5:302015-11-09T23:45:10+5:30
अभिरंग पहाट : प्रमुख नृत्यसंस्थांनी एकत्र येत बांधली नृत्यपूजा

कथक नृत्याविष्काराचे अर्घ्य
नाशिक : एकीकडे सादरा, दादऱ्यापासून ते कजरी, ठुमरी, होरी, चैती अशा शास्त्रीय संगीतातील एकापाठोपाठ एका प्रकारावर नृत्यनिपुण पाय थिरकत होते अन् दुसरीकडे दीपोत्सवातील धनत्रयोदशीची चैतन्यमय पहाट हळूहळू उजळत होती... शहरातील प्रमुख नृत्यसंस्थांनी एकत्र येत दीपोत्सवात बांधलेली ही नृत्यपूजा रसिकांना जणू स्वर्गानुभवच देऊन गेली...
अभिजात नृत्य-नाट्य संगीत अकादमी, कीर्ती कलामंदिर, कलानंद नृत्यसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या ‘कथक अभिरंग पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन गंगापूररोड येथील रचना ट्रस्टच्या प्रांगणात आज पहाटे करण्यात आले. या उपक्रमाचे यंदाचे सहावे वर्ष होते. पहाटे साडेपाच वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाला उपमहापौर गुरुमित बग्गा, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, उपआयुक्त श्रीकांत ढिवरे, रचना ट्रस्टच्या शोभा नेर्लीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अभिजात अकादमीच्या शुभांगी साळवे व विद्यार्थिनींनी दीपनृत्य, सूर्यवंदना सादर करीत कार्यक्रमाला प्रारंभ केला. त्यानंतर कीर्ती कलामंदिराच्या अदिती पानसे-नाडगौडा यांनी दादऱ्यावर, तर ‘अभिजात’च्या प्रेषिता पाठक यांनी पं. कुमार गंधर्व यांच्या ‘ऋतु आयी बोले मोरा रा’ या कजरीवर नृत्याविष्कार सादर केला. ‘कलानंद’च्या सुमुखी अथनी यांनी ‘कान्हा मोहे नित रोकत’ या ठुमरीवर केलेल्या पदन्यास रसिकांना मुग्ध करून गेला. या संस्थेच्या विद्यार्थिनींनी ‘बरसन लागी बदरिया’ या कजरीवर, तर ‘अभिजात’च्या विद्या देशपांडे यांनी ‘रंजिश ही सही’ या गझलेवर नृत्याविष्कार सादर केला. ‘धनतेरस दिन अति सुखदायी’ या सुनील देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेल्या बंदिशीने मैफलीचा समारोप झाला.
पुष्कराज भागवत, अश्विनी भार्गवे, रसिका जानोरकर, सुनील देशपांडे यांनी गायन केले. नितीन पवार (तबला), भास भामरे (ढोलकी), प्रशांत महाबळ (सिंथेसायझर), ईश्वरी दसककर (हार्मोनियम), सुजित काळे (तबला) यांनी संगीतसाथ केली. प्रथमेश पाठक यांनी निवेदन केले. प्रकाशयोजना विनोद राठोड यांची होती. कवी किशोर पाठक, विवेक गरुड, मोहन उपासनी आदिंसह रसिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)