टीव्हीमुळे करपले माणूसपण
By Admin | Updated: July 13, 2015 00:07 IST2015-07-13T00:05:15+5:302015-07-13T00:07:09+5:30
विवेक घळसासी : पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचा समारोप

टीव्हीमुळे करपले माणूसपण
नाशिक : माणूस हा सामाजिक प्राणी असून, त्याची स्वतंत्र विचार-क्षमतादेखील आहे; मात्र टीव्हीच्या वाहिन्यांच्या हल्ल्यामुळे माणसाची स्वतंत्र वैचारिक क्षमता धोक्यात आली आहे. परिणामी माणसाचे माणूसपण करपलं जात असून, माणसाने विवेकबुद्धीने विचार करणे गरजेचे आहे. टीव्हीवरून लादले जाणारे विचार ‘जैसे-थे’ स्वीकारू नये, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी केले आहे.
स्वर्गीय रामराव तथा पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प घळसासी यांनी ‘टीव्ही चॅनल्स्च्या गोंधळात भरकटलेले आपण’ या विषयावर गुंफले. यावेळी बोलताना घळसासी म्हणाले, माणसामध्ये नवी सृष्टी निर्माण करण्याचीही क्षमता आहे; मात्र त्यासाठी माणूसपणाचं भान असणे आवश्यक आहे. टीव्ही माणसाच्या जीवनामध्ये जणू काही महत्त्वाचा घटकच बनला आहे, त्यामुळे टीव्हीला कायमची सोडचिठ्ठी देता येणार नाही आणि टीव्हीला विरोधदेखील नाही; परंतु टीव्ही वाहिन्यांचे (धार्मिक चॅनल्स्सह) विविध कार्यक्रम, चर्चासत्राच्या माध्यमातून मांडण्यात येणाऱ्या पत्रपंडितांचे तयार विचार स्वीकारू नये. माणसाने विवेकबुद्धीचा वापर करत स्वतंत्ररीत्या विचार करावा. कारण तयार विचार स्वीकारणे हे घातक आहे हे लक्षात घ्यावे. आवडलेली प्रत्येक गोष्ट ही हीतकारकच असते असा गैरसमज काढून टाकावा, असे आवाहन घळसासी यांनी यावेळी केले. माणसाच्या सामाजिकतेवर आणि स्वतंत्र वैचारिक क्षमतेवर टीव्हीने हल्ला चढविला आहे. मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य समाजात आहे; मात्र इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून माणसाच्या वैचारिक स्वातंत्र्यावरच आघात केला जात आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
प्रगतिशील व पुरोगामी विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आजच्या चॅनलवाल्यांकडे नाही, असे ते यावेळी म्हणाले. देणारा काही देत असला तरी घेणाऱ्यांनी आपली विवेकबुद्धी गहाण ठेवू नये, तर स्वत:च्या विचारक्षमतेने निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन घळसासी यांनी श्रोत्यांना उद्देशून केले. यावेळी आमदार सीमा हिरे, सुरेश पाटील, सुमन पाटील, यशवंत पाटील, भीमराव गाडे, डॉ. संजय पाटील, विराज लोमटे
आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)