प्रधान सचिवांच्या आदेशाला केराची टोपली
By Admin | Updated: August 2, 2015 00:26 IST2015-08-02T00:26:06+5:302015-08-02T00:26:54+5:30
एस.टी. कार्यालयात गटनेत्याला विदारक अनुभव

प्रधान सचिवांच्या आदेशाला केराची टोपली
नाशिक : राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमदार/ खासदार महापालिका/ जिल्हा परिषद व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींना आवश्यक तो मान-सन्मान द्यावा व त्यांनी दिलेल्या निवेदन व अर्जांना पोहोच द्यावी, असे आदेश प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी काढलेले असताना त्याचा नेमका उलटा अनुभव राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक येथील विभागीय कार्यालयात जिल्हा परिषदेतील शिवसेना गटनेते प्रवीण जाधव यांना आला.
प्रवीण जाधव यांनी आता याप्रकरणी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे याबाबत तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक ते वणी मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अक्राळे फाटा व तळेगाव फाटा येथे थांबत नसल्याची तक्रार अनेक शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद गटनेते प्रवीण जाधव यांच्याकडे बसेस थांबत नसल्याची तक्रार केल्यानंतर त्याबाबत विचारणा करण्यासाठी प्रवीण जाधव विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांच्याकडे शुक्रवारी गेले होते. मात्र जोशी यांनी जाधव यांना सिंहस्थांचे काम सुरू असल्याचे कारण सांगत भेट नाकारली. तसेच त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. याउलट जुलै महिन्यातच सामान्य प्रशासन विभागाच्या एका परिपत्रकानुसार लोकप्रतिनिधींना शासकीय कार्यालयात योग्य तो आदर व मानसन्मान देण्यात यावा, तसेच त्यांनी दिलेले निवेदन व अर्जांचा स्वीकार करून त्याची पोहोच देण्यात
यावी, असे शासन निर्णयात म्हटले आहे.
मात्र राज्य परिवहन विभागात मात्र याचा वेगळाच अनुभव शिवसेना गटनेते प्रवीण जाधव यांना आला. विशेष म्हणजे राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते हे शिवसेनेचे असल्याने आता या प्रकरणाला गंभीर वळण लागण्याची चिन्हे आहेत.(प्रतिनिधी)