शासनाच्या मुद्रा योजनेला केराची टोपली
By Admin | Updated: January 5, 2016 23:04 IST2016-01-05T22:30:29+5:302016-01-05T23:04:49+5:30
असहकार्य : बॅँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची मनमानी

शासनाच्या मुद्रा योजनेला केराची टोपली
द्याने : छोट्या उद्योजकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली पंतप्रधान मुद्रा योजना बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे बारगळली आहे.
बँकांकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याने अनेक बेरोजगार या चांगल्या योजनेपासून अनभिज्ञ आहेत. अनेक बँका छोट्या व्यावसायिकांची दिशाभूल करीत आहेत, तर काही बँका कागदपत्रांसाठी अडवणूक करीत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. अनेक बँकांनी टार्गेट पूर्ण करण्यासाठी जुन्याच खातेदारांच्या नावे कर्ज प्रकरणे करून मोकळे झाले आहेत.
मुद्रा कर्ज योजनेंतर्गत शिशू, किशोर आणि तरुण अशा तीन टप्प्यात कर्जाचे वितरण आहे.
शिशू योजनेंतर्गत ५० हजार, किशोर योजनेंतर्गत ५ लाख व तरुण योजनेंतर्गत १० लाख रुपयांचे कर्ज देण्यात येते.
शासकीय जाहिरातीत शिशू, किशोर आणि तरुण मुद्रा कर्ज योजना वाटप प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात येते; मात्र बहुतांश बँकांमध्ये केवळ ५० हजारांचे कर्ज वाटप सुरू आहे. त्यातही कर्जदाराला योग्य मार्गदर्शन न करता चुकीची माहिती देऊन बँका दिशाभूल करीत आहेत.
या योजनेला नामपूर परिसरात मोठा प्रतिसादही मिळत आहे; मात्र बँक अधिकाऱ्यांच्या नैतिकतेमुळे शासनाच्या योजनांना केराची टोपली दाखविली जात आहे. (वार्ताहर)