वावीच्या सरपंचपदी कन्हैयालाल भुतडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:18 IST2021-02-26T04:18:58+5:302021-02-26T04:18:58+5:30
वावी: सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या व राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या वावीच्या सरपंचपदी कन्हैयालाल लक्ष्मीनारायण भुतडा यांची बिनविरोध ...

वावीच्या सरपंचपदी कन्हैयालाल भुतडा
वावी: सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या व राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या वावीच्या सरपंचपदी कन्हैयालाल लक्ष्मीनारायण भुतडा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसरपंचपदी मीना नवनाथ काटे यांची वर्णी लागली.
वावी ग्रा. पं. निवडणुकीत माजी सरपंच विजय काटे, रामनाथ कर्पे, विजय सोमाणी यांच्या नेतृत्वाखाली श्री गुरुकृपा पॅनलचे ११ पैकी १० सदस्य विजयी झाले होते. त्यामुळे सरपंच व उपसरपंच निवडणुकीत गुरुकृपा पॅनलच्या सदस्यांची निवड निश्चित होती. मात्र, सरपंचपद सर्वसाधारण असल्याने चुरस वाढली होती. तथापि, पॅनलचे नेते रामनाथ कर्पे, विजय काटे, डॉ. कमलाकर कपोते, विजय सोमाणी यांच्यासह ज्येष्ठांनी बिनविरोध निवड करण्यासह सर्वांना टप्प्याटप्प्याने संधी देण्याचा निर्णय घेतला.
निवडणूक निर्णय अधिकारी सचिन कापडणीस यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी परेश जाधव यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. सरपंच निवडीच्या विशेष सभेस ग्रामपंचायत सदस्य विजय काटे, प्रशांत कर्पे, संदीप राजेभोसले, मीना मंडलिक, प्रेमलता जाजू, साधना घेगडमल, आश्विनी वेलजाळी, दीपाली खाटेकर आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच भुतडा व उपसरपंच काटे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला.
---------------
एकमेव अर्ज दाखल
निर्धारित वेळेत सरपंचपदासाठी विजय काटे व कन्हैयालाल भुतडा यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. कन्हैयालाल भुतडा यांच्या अर्जावर सूचक म्हणून संदीप राजेभोसले यांची स्वाक्षरी होती. उपसरपंचपदासाठी मीना नवनाथ काटे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक म्हणून प्रेमलता कैलास जाजू यांची स्वाक्षरी होती. सरपंचपदासाठी विजय काटे यांनी माघार घेतल्याने कन्हैयालाल भुतडा यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला. त्यामुळे सरपंचपदी कन्हैयालाल भुतडा व उपसरपंचदी मीना काटे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
----------
वावीच्या सरपंचपदी कन्हैयालाल भुतडा तर उपसरपंचपदी मीना काटे यांची बिनविरोध निवड झाली. त्याप्रसंगी जल्लोष करताना विजय काटे, प्रशांत कर्पे, संदीप राजेभोसले, प्रेमलता जाजू, मीना मंडलिक, साधना घेगडमल, आश्विनी वेलजाळी, दीपाली खाटेकर यांच्यासह कार्यकर्ते. (२५ वावी सरपंच)
===Photopath===
250221\25nsk_15_25022021_13.jpg
===Caption===
२५ वावी सरपंच