सिडको परिसरातून कानबाई माता मिरवणूक
By Admin | Updated: August 9, 2016 00:54 IST2016-08-09T00:49:26+5:302016-08-09T00:54:05+5:30
पारंपरिक गाणी सादर : महिलांचा मोठा सहभाग

सिडको परिसरातून कानबाई माता मिरवणूक
सिडको : कानबाई माता सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने सिडकोतील उत्तमनगर, पवननगर, सावतानगर परिसरातून कानबाई मातेची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांसह भाविक सहभागी होऊन कानबाई मातेच्या भजनात तल्लीन झाले होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सिडको भागातील श्री कानबाई माता सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणावर कानबाई महोत्सव साजरा करण्यात आला. रविवारी (दि. ७) उत्तमनगर, सावतानगर, त्रिमूर्ती चौक भागात घरोघरी कानबाई मातेची स्थापना करण्यात आली होती. सोमवारी (दि. ८) सकाळी वाजतगाजत मोठ्या थाटात कानबाई मातेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिलांनी कानबाई मातेची पारंपरिक गाणी म्हणत फुगड्या खेळत फेर धरला. तसेच ठिकठिकाणी मिरवणूक घरासमोर आल्यावर महिलांनी कानबाई मातेसमोर श्रीफळ वाढवून पूजा व आरती
केली.
सदर मिरवणुकीस उत्तमनगर बसथांबा येथून प्रारंभ झाला. मिरवणूक महाकाली चौक, हिरे विद्यालय, पार्थेश टीव्ही सेंटरमार्गे अण्णा पाटील शाळेजवळील गाढवे सभागृह हनुमान मंदिरनजीक मिरवणुकीचा समारोप झाला. कानबाई माता मिरवणुकीत रवि पाटील, नितीन माळी, भगवान पाटील, रवींद्र पाटील, नीलेश ठाकरे, वसंत चौधरी, यशवंत नेरकर, मनोज हिरे आदिंसह भाविक सहभागी झाले होते. (वार्ताहर)