कळवण मर्चंटचे संचालक निंबा कोठावदे अपात्र
By Admin | Updated: August 26, 2016 00:42 IST2016-08-26T00:41:23+5:302016-08-26T00:42:20+5:30
थकबाकी : जिल्हा उपनिबंधकांचे आदेश

कळवण मर्चंटचे संचालक निंबा कोठावदे अपात्र
नाशिक : सहकारी पतसंस्थेकडून दहा लाखांचे कर्ज घेऊन त्याची वेळेत परतफेड न केल्याच्या कारणावरून थकाबाकीदार असलेल्या कळवण मर्चंट को-आॅप. बॅँकेचे संचालक निंबा बळवंत कोठावदे यांना संचालकपदी राहण्यास अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी दिला आहे.
यासंदर्भात नितीन रघुनाथ अमृतकर यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे निंबा कोठावदे थकबाकीदार असल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात यावे, यासाठी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यासाठी पुराव्यादाखल कागदपत्रेही जोडली होती. त्यावर जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी चौकशी केली. निंबा कोठावदे यांनी अंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडून दहा लाखांचे हायपोथिकेशन कर्ज घेतले होते. ते तीन वर्षांत समान हप्त्यात भरणे आवश्यक असताना त्यांनी ते हप्ते न भरता अंबिका ग्रामीण पतसंस्थेचे कर्ज थकविले. याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सहा वेळा सुनावणी होऊन दोन्ही बाजू ऐकून घेण्यात आल्या. त्यानंतर निंबा बळवंत कोठावदे हे अंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे थकबाकीदार कर्जदार असल्याचे आढळून आल्याने जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी निंबा कोठावदे यांना कळवण मर्चंट को-आॅप. बॅँकेच्या संचालकपदी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७३ क अ (१) व कलम ७८-अ (१) (ब) नुसार संचालक पदावर राहण्यास अपात्र ठरविण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)