कालिका मंदिर २४ तास उघडे राहणार

By Admin | Updated: October 5, 2015 22:55 IST2015-10-05T22:53:49+5:302015-10-05T22:55:16+5:30

नवरात्रोत्सव : कायमस्वरूपी कॅमेरे कार्यान्वित

The Kalika temple will be open for 24 hours | कालिका मंदिर २४ तास उघडे राहणार

कालिका मंदिर २४ तास उघडे राहणार

नाशिक : नाशिकची ग्रामदेवता असलेल्या श्री कालिका मंदिराचे विश्वस्त व प्रशासन यंत्रणेतील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होऊन नवरात्रोत्सवात दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर चोवीस तास उघडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, त्याचबरोबर सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून मंदिर आवारात कायमस्वरूपी सीसीटीव्ही तसेच प्रत्येक भाविकाचा अपघाती विमा उतरविण्याची घोषणाही मंदिर व्यवस्थापनाने केली.
नवरात्रोत्सवात भरणाऱ्या यात्रेच्या पूर्वतयारीसाठी घेण्यात आलेल्या या बैठकीत भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन मंदिराच्या बाहेर लागणाऱ्या हॉटेल्स व खाद्यपेय विक्रेत्यांना बंदी घालण्याचा मनोदय पोलिसांनी व्यक्त केला. खाद्यपेय विक्रेत्यांकडून गॅस सिलिंडरचा वापर केला जातो, ते लक्षात घेता संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, मात्र अग्निशामक दलाचे प्रमाणपत्र असेल तर त्याबाबत विचार करण्याचे ठरविण्यात आले. मंदिराच्या बाहेर भाविकांकडून पादत्राणे काढले जातात, जितके भाविक दर्शनासाठी येतात तितकेच दर्शन करून बाहेर पडतात, एकाच वेळी भाविक पादत्राणे घेण्यासाठी व काढण्यासाठी जमत असल्यामुळे चेंगराचेंगरीची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे ज्या मार्गावरून भाविक येतील त्या त्या मार्गावर चप्पल स्टॅण्ड करण्यात यावे व बचत गटामार्फत ते चालविले जावे, अशी सूचना करण्यात आली. तसेच भाविकांच्या मार्गावरच वाहनतळांसाठी जागा निश्चित करण्यात यावी, जेणे करून रस्त्यात कोठेही वाहने लावली जाणार नाहीत, असेही सुचविण्यात आले.
या बैठकीत मंदिर व्यवस्थापनाने केलेल्या तयारीचा आढावा सादर करण्यात आला. मंदिर व्यवस्थापनाकडून मंदिर परिसरात २४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत तसेच माजी सैनिक, अनिरुद्ध बापू संस्था, नागरी संरक्षण दलाकडून स्वयंसेवक नेमण्यात येतील त्याचबरोबर मंदिर परिसरात स्वच्छतेसाठी महिला बचत गटाच्या ४० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल, महिला व पुरुष भाविकांनी स्वतंत्र दर्शन रांग तसेच मंदिर परिसरात प्रसादाचे २० स्टॉल लावण्यात येणार असल्याची
माहिती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष केशवराव तथा अण्णा पाटील यांनी दिली.
या बैठकीला विश्वस्त मंडळाचे सुभाष तळाजिया, डॉ. प्रतापराव कोठावळे, परमानंद कोठावळे, विजय पवार, किशोर कोठावळे, आबासाहेब पवार, मनपाच्या विभागीय अधिकारी सोनवणे, पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्यासह अग्निशामक दल, वीज कंपनी, शहर वाहतूक पोलीस आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The Kalika temple will be open for 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.