कालिदास कलामंदिर आजपासून वर्षभर बंद
By Admin | Updated: July 16, 2017 00:27 IST2017-07-16T00:27:06+5:302017-07-16T00:27:21+5:30
नाशिक : गेल्या तीस वर्षांपासून नाशिकचे सांस्कृतिक केंद्र बनलेले महाकवी कालिदास कलामंदिर नव्याने कात टाकण्यासाठी रविवार (दि.१६)पासून वर्षभरासाठी बंद राहणार आहे.

कालिदास कलामंदिर आजपासून वर्षभर बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या तीस वर्षांपासून नाशिकचे सांस्कृतिक केंद्र बनलेले महाकवी कालिदास कलामंदिर नव्याने कात टाकण्यासाठी रविवार (दि.१६)पासून वर्षभरासाठी बंद राहणार आहे. महापालिकेमार्फत स्मार्ट सिटीच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ९ कोटी २५ लाख रुपये खर्चून कालिदास कलामंदिरचे नूतनीकरण केले जाणार असून, वर्षभराकरिता नाशिककर रसिकांना अन्य पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. शनिवारी (दि.१५) रात्री नाशिकच्या कलावंतांनी पु. ल. देशपांडे लिखित ‘तीन पैशांचा तमाशा’ या नाटकाचा प्रयोग सादर करत कालिदास कलामंदिराला मानवंदना दिली.
नगरपालिका काळातील खुले लोकमान्य नाट्यगृह असलेल्या जागेत महापालिकेने १९८७ मध्ये महाकवी कालिदास कलामंदिराची उभारणी केली. त्यावेळी किर्लोस्कर कन्सल्टंटने कालिदास कलामंदिराच्या बांधकामाची जबाबदारी पेलली होती. ३० मार्च १९८७ रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तत्कालीन अध्यक्ष व नाट्य दिग्दर्शक विजया मेहता यांच्या उपस्थितीत कालिदास कलामंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडला होता. कालिदास कलामंदिराच्या उभारणीनंतर किरकोळ डागडुजीची कामे होत राहिली. बाळासाहेब सानप यांच्या महापौरपदाच्या कारकीर्दीत खुर्च्या नव्याने बसविण्यात आल्या. परंतु, कालिदास कलामंदिराचा मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास ३० वर्षांनंतर प्रथमच होत आहे. महापालिकेला कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या कंपनीने ९ कोटी २५ लाख रुपये मंजूर केले आहेत. स्मार्ट सिटी आराखड्यानुसार रेट्रोफिटिंग प्रकल्पांतर्गत हे नूतनीकरण होणार आहे. नूतनीकरणाचे काम न्यू इन्फ्रास्ट्रक्चर या मुंबईच्या कंपनीला देण्यात आले असून, वास्तुविशारद धीरज पाटील यांच्या देखरेखीखाली कामे पार पडणार आहेत. कलामंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर या वास्तुला नवी झळाळी मिळणार आहे.
..अशी होणार कामे
कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करताना कालिदास कलामंदिरामधील फ्लोरिंग, खुर्च्या बदलण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत कालिदास कलामंदिराच्या छतावर सीमेंटचे पत्रे आहेत. ते काढून फॅक्टरीमेड फायबरचे पत्रे टाकले जाणार आहेत. अत्याधुनिक ध्वनिव्यवस्था बसविण्यात येणार असून, अॅकॉस्टिक केले जाणार आहे. विद्युत व्यवस्था, अग्निरोध यंत्रणा अद्ययावत केली जाणार आहे. कालिदास कलामंदिराची पूर्ण रंगरंगोटी करण्याबरोबरच रंगमंचाचीही सुधारणा, नूतनीकरण केले जाणार आहे. व्हीआयपी रूम, मेकअपरूम, भोजनकक्ष नव्याने करण्यात येणार आहे. स्वच्छतागृहाची संख्या वाढविण्यात येणार आहे.