‘कालिदास’मध्ये बदल दिसेना !

By Admin | Updated: August 9, 2015 23:55 IST2015-08-09T23:54:21+5:302015-08-09T23:55:05+5:30

प्रशांत दामले यांनी व्यक्त केली खंत

'Kalidas' can not change! | ‘कालिदास’मध्ये बदल दिसेना !

‘कालिदास’मध्ये बदल दिसेना !

नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिराच्या सुधारणेला प्रारंभ झाला असला, तरी अद्याप तरी नाट्यगृहात दिसण्याजोगा कोणताही बदल झालेला नाही. खुर्च्या, स्वच्छतागृहे तशीच असून, त्यांच्या कड्या दोन्ही बाजूंनी लागत नाही. त्यामुळे आत जाणाऱ्याला गाणे गावे लागते, असा टोला अभिनेते तथा व्यावसायिक नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी लगावला.
नाटकाच्या प्रयोगासाठी नाशिकमध्ये आलेल्या दामले यांनी व्यावसायिक नाट्य निर्माता संघाच्या वतीने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांना देण्यासाठीचे निवेदन पत्रकारांना सादर केले. ते म्हणाले, ‘कालिदास’मध्ये नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर कलावंतांसाठी बसून जेवणाची सोय होणे अत्यंत गरजेचे आहे. लॉजिंगची अवस्थाही बिकट आहे. दुरवस्था दूर करण्यासाठी संपूर्ण रस घेऊन काम करणाऱ्या पूर्णवेळ, कायमस्वरूपी अधिकाऱ्याची गरज आहे. शहरातील ज्येष्ठ रंगकर्मीला सहायक व्यवस्थापकपद दिल्यास तो अडचणी ओळखून त्यावर मार्ग काढू शकेल. कालिदासमध्ये सुधारणा करणे हे केवळ आठ-दहा दिवसांचे काम आहे. फक्त इच्छाशक्ती हवी. आज दुपारी नाटकाचा प्रयोग सादर केला; मात्र नाट्यगृहात कोणतेही ठोस बदल दिसले नाहीत, असेही ते म्हणाले. आपली नाट्य प्रशिक्षण संस्था ‘टी स्कूल’ नाशिकमध्ये सुरू व्हावी, अशी इच्छा आहे; मात्र शिक्षकांची अडचण असल्याचे त्यांनी सांगितले.
नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांच्या हस्ते दामले यांचा सत्कार करण्यात आला. हॉल नूतनीकरणासाठी देणगी दिल्याबद्दल डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांचा गौरव करण्यात आला. रवींद्र ढवळे, श्याम दशपुत्रे, ईश्वर जगताप, राजेंद्र जाधव, सुनील परमार, महेश डोकफोडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'Kalidas' can not change!