पूर्वजांच्या स्मृतीसाठी करतात कलशपूजन : साडेतीन मुहूर्तांपैकी एक
By Admin | Updated: April 27, 2017 18:20 IST2017-04-27T18:20:43+5:302017-04-27T18:20:43+5:30
माहेरवाशिणीला खरोखरच मोलाचा वाटणारा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने खेड्यापाड्यात आणि काही प्रमाणात शहरात आजही अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो.

पूर्वजांच्या स्मृतीसाठी करतात कलशपूजन : साडेतीन मुहूर्तांपैकी एक
नाशिक : ‘गेला झोका गेला झोका गेला तो सासरले, जी आला झोका आला पलट माहेराले जी’ असा झोका खेळण्याचा सण, ज्याचे वर्णन प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी मोलाचा सण असे केले आहे. माहेरवाशिणीला खरोखरच मोलाचा वाटणारा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने खेड्यापाड्यात आणि काही प्रमाणात शहरात आजही अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी पूर्वजांच्या स्मृतीसाठी कलशपूजन करतात.
अक्षय्यतृतीयेला खान्देशात आखाजी असे म्हणतात. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या बागलाण पट्ट्यात हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. पौराणिक ग्रंथात आखाजी सणाचा उल्लेख आहे. या दिवशी केलेले पुण्यकर्म क्षय पावत नाही. म्हणजे अक्षय राहते, असे मानले जाते. वैशाख शुद्ध तृतीयेला हा सण येतो. आखाजी सण प्रामुख्याने मुली व महिलांचा मानला जातो. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात, म्हणजे गौराई माहेराला येतात. चैत्र चतुर्दशीला मुली घरोघरी गौराई बसवितात. भुलाबाईप्रमाणे गौराई सजवितात. रोज झोका खेळत गाणी म्हटली जातात. ‘चैत्र वैशाखाचे ऊन’, निंबावरी निंबावरी बांधला झोका जी’, अशी अनेक सुख-दु:खाची गाणी यात असतात. आता माहिती तंत्रज्ञानाच्या युगात दूरध्वनी, मोबाइल, एसएमएसच्या जमान्यात रोजच्या निरोपामुळे या सणाचे इतके अप्रूप राहिले नसले तरी याचे धार्मिक महत्त्व मात्र टिकून आहे.