कळवण तालुक्यातील धरणे फुल्ल !
By Admin | Updated: September 13, 2014 00:56 IST2014-09-11T22:05:39+5:302014-09-13T00:56:07+5:30
कळवण तालुक्यातील धरणे फुल्ल !

कळवण तालुक्यातील धरणे फुल्ल !
कळवण
तालुक्यात सुरू असलेल्या संततधारेने चणकापूर, अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पासह तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्प, पाझर तलाव, सीमेंट बंधारे १०० टक्के भरले आहेत. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून गिरणा व पुनंद नदीपात्रात हजारो क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गिरणा व पुनंद नदीला पूर येणार असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शेकडो पाझर तलाव व सीमेंट बंधारे पावसामुळे फुल्ल झाल्याने परिसरातील विहिरींच्या पातळीत वाढ झाली असून, लपा प्रकल्प, तलाव व बंधारे शेतकरी बांधवांना वरदान ठरले आहे. गेल्या वर्षी १० सप्टेंबरपर्यंत चणकापूर धरण लाभक्षेत्रात ५०१ मिमी पाऊस झाला होता. यावर्षी आजपर्यंत ८०२ मिमी पाऊस झाला असल्याची नोंद शासन दप्तरी
आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत ३०० मिमी पाऊस जास्त झाल्याने लपा प्रकल्प व तलाव पाण्याने तुडुंब भरले आहेत. यावेळी सर्व नद्या, नाले पाण्याने तुडुंब वाहत आहेत. चणकापूर उजव्या कालव्यालादेखील पाणी सोडल्याने कालवा क्षेत्रातील विहिरीच्या पातळीत वाढ झाली असून, एक महिन्यापासून जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे.
गेल्या तीन दिवसांपूर्वी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी व नाले यांना पूर आला आहे. चणकापूर व अर्जुनसागर या प्रकल्पातून गिरणा व पुनंद नदीत हजारो क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. (वार्ताहर)