काजीगढीची ‘आपत्ती’
By Admin | Updated: July 12, 2016 00:50 IST2016-07-12T00:43:00+5:302016-07-12T00:50:12+5:30
माती ढासळू लागली : रहिवाशांना २४ तासांत स्थलांतरित होण्याच्या सूचना

काजीगढीची ‘आपत्ती’
नाशिक : रविवारी (दि.१०) झालेल्या जोरदार पावसाने काजीगढीची माती ढासळत असून, नदीकाठच्या दिशेने असलेल्या गढीवरील सुमारे शंभर नागरिकांना पालिकेने तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत.
शनिवारपासून शहरात होणाऱ्या संततधारेने रविवारी जोर धरल्याने गोदावरीलाही पूर आला. दरम्यान,नदीच्या दिशेने असलेला गढीचा काही भाग ढासळला. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन विभागाने तातडीने पूर्व विभागाला आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत रहिवाशांना सतर्क करण्याच्या सूचना दिल्या. पूर्वचे विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत येत्या २४ तासांत नदीकाठच्या दिशेने असलेल्या गढीच्या धोकादायक भागावरील शंभर नागरिकांना घरे सोडण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने पालिकेच्या पूर्व विभागीय प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देत नागरिकांची समजूत काढून येत्या २४ तासांमध्ये सुरक्षित स्थलांतरित होण्याचे आदेश जारी केले आहे. दोन वर्षांपूर्वी गढी कोसळल्याने २५ घरे मातीमोल झाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली; मात्र अद्याप गढीचा तिढा सुटलेला नसून गढी सुरक्षित नसल्याने पावसाळ्यात गढीची आपत्ती ओढावण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्रमुख अनिल महाजन यांनी पूर्व विभागीय अधिकाऱ्यांना सूचना देत आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार २४ तासांमध्ये सुरक्षित स्थलांतराच्या नोटिसा बजावण्याचे सूचित केले आहे.