मानाच्या फेट्यांना मिळतेय केराची टोपली
By Admin | Updated: March 30, 2017 22:28 IST2017-03-30T22:28:11+5:302017-03-30T22:28:26+5:30
बेलगाव कुऱ्हे : विवाहसमारंभात वधू-वर पक्षांकढून वऱ्हाडी मंडळींच्या डोक्याला बांधण्यात येणारा फेटा दोन मिनिटांतच मातीमोल होत आहे

मानाच्या फेट्यांना मिळतेय केराची टोपली
बेलगाव कुऱ्हे : विवाहसमारंभात वधू-वर पक्षांकढून वऱ्हाडी मंडळींच्या डोक्याला बांधण्यात येणारा फेटा दोन मिनिटांतच मातीमोल होत असल्याने फेट्यांवर यजमानांनी खर्च करावा का, असा प्रश्न आता निर्माण होऊन यावर विचार करण्याची वेळ आली आहे. एकेकाळी विवाह सोहळ्यात फेट्यांना महत्त्व होते. पाहुण्यांना मानपान म्हणून मोठ्या आपुलकीने फेटा बांधला जायचा. मात्र, सध्या मानाच्या या फेट्यांना समाजाकडून केराची टोपली मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
विवाहात वर-वधू पित्याकडून मिळणाऱ्या फेट्यांचा ग्रामीण भागात पशुपालक व शेतकरी शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी बैलांना बांधण्यासाठी सर्रास वापर करीत आहेत. महिलांकडूनही विहिरीतून पाणी काढण्यासाठी या फेट्यांचा वापर होताना दिसत आहे. हे चित्र फक्त शहरी भागातही दिसून येत
आहे.
लहान मुलांना झोका बांधण्यासाठी, किराणा व्यापारी दुचाकीवर मालाची पोती, पिशव्या बांधण्यासाठी, अनेक नागरिक सिलिंडरची वाहतूक करण्यासाठी फेट्यांचा वापर करतात. मुंबई येथील मच्छीमार मार्केटाच्या ठिकाणी माल वाहून नेण्यासाठीही फेट्यांचा उपयोग होतो. बाजार समितीपर्यंत भाजीपाला जाळ्या बांधून नेण्यासाठीसुद्धा फेट्यांचा उपयोग करतात.
ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिक फेट्यांपासून नाडा बनविण्याच्या कामात सदैव व्यस्त असतात. विवाहात मोठ्या सन्मानाने पाहुण्यांना फेटा बांधला जातो. लग्नात कोणाचा रु सवा फुगवा नको म्हणून वधू-वर कुटुंबीयांकडून फेट्यांवर अमाप खर्च केला जातो. लग्न समारंभात फेट्याला मानाचे स्थान आहे. साधारण एका फेट्यासाठी ३० ते ४० रु पये मोजावे लागतात. यावर विवाहात दोन्ही पक्षांकडून ६० ते ७० हजार रु पये खर्च होतो. २००५ पूर्वी हाच फेटा सुमारे पाच ते सात रु पये किमतीला होता. आता मात्र त्याची किंमत दुपटीने वाढूनही त्याची मागणी कमी झालेली नाही. हाच फेटा पूर्वी पाच ते सहा मीटरचा असायचा आता मात्र तो तीन ते चार मीटरचा असतो. त्यामुळे त्याला फेटा म्हणायचे का चिंधी, असा प्रश्न निर्माण होतो. (वार्ताहर)