मुख्य अभियंत्यांच्या आदेशालाच केराची टोपली

By Admin | Updated: July 23, 2016 01:42 IST2016-07-23T01:39:36+5:302016-07-23T01:42:52+5:30

मजूर संघाची हरकत : सिन्नर तलाठी कार्यालय प्रकरण

Kairachi basket in the order of chief engineer | मुख्य अभियंत्यांच्या आदेशालाच केराची टोपली

मुख्य अभियंत्यांच्या आदेशालाच केराची टोपली

नाशिक : सिन्नर तालुक्यातील तीस तलाठी कार्यालयांच्या कामांची एकत्रित निविदा काढण्याचा सार्वजनिक बांधकाम खात्याचा निर्णय मुख्य अभियंत्यांच्या २२ फेब्रुवारीच्या निर्णयाला केराची टोपली दाखविणारा असल्याचे जिल्हा मजूर सहकारी संघाचे म्हणणे आहे.
शुक्रवारी (दि. २२) नाशिक जिल्हा मजूर सहकारी संघाने सार्वजनिक बांधकाम विभागाला सिन्नर तालुक्यातील तीस कामांची एकत्रित निविदा काढण्याचा प्रकार मजूर सहकारी संस्थांवर अन्यायकारक असल्याचे म्हणत हरकत घेतली आहे. याबाबत ‘लोकमत’नेच २१ जुलै रोजी ‘सिन्नरच्या ३० तलाठी कार्यालयांच्या कामांसाठी एकत्रित निविदा’ शीषर्काखाली वृत्त प्रकाशित करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा निर्णय लहान-मोठ्या मजूर सहकारी संस्थांवर व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांवर अन्यायकारक ठरणार असल्याचे स्पष्ट केले होते.
विशेष म्हणजे, यापूर्वीच जिल्हा मजूर सहकारी संघाने १० फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना इगतपुरी तालुक्यातच त्यावेळी झालेल्या अशाच रस्ते कामांच्या एकत्रित निविदेबाबत पत्र दिले होते. त्याचवेळी २२ फेब्रुवारी २०१६ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता रणजित हांडे यांनी नाशिक विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना चार मुद्द्यांबाबत पत्र दिले होते. त्यात तीन लाखांपेक्षा कमी किमतीच्या विविध कामांचे एकत्रिकरण (क्लबिंग) करताना केलेल्या कामांची किंमत १५ लाखापर्यंतच मर्यादित ठेवावी, सर्वसाधारणपणे १५ लाखांच्या आतील कामांच्या आतच कामांचे क्लबिंग करावे, १५ लाखांच्या वर कामांचे एकत्रिकरण (क्लबिंग) करू नये, असे यापत्रात स्पष्ट केले होते. मुख्य अभियंत्यांचे अधीक्षक अभियंत्यांना असे आदेश असताना प्रत्यक्षात सिन्नर तालुक्यातील ३० तलाठी कार्यालयांच्या कामांचे एकत्रिकरण करून मुख्य अभियंत्यांच्या आदेशाला विभागानेच केराची टोपली दाखविली आहे. २२ जुलै रोजी जिल्हा मजूर संघाने मागील मुख्य अभियंत्यांच्या आदेशाची प्रत सोबत जोडत पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना सिन्नर तालुक्यातील ३० कामांच्या एकत्रिकरणाबाबत जाब विचारला आहे. तसेच मजूर संस्थांना ‘शासकीय सवलतीने देण्यापात्र १५ लाखांच्या आतील ३३ टक्के कामे स्वतंत्रपणे प्रचलित पद्धतीने मिळावीत, असे पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे आता सिन्नरच्या ३० तलाठी कार्यालयांची कामे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Kairachi basket in the order of chief engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.