अवघ्या आयुष्याचा ‘तमाशा’ झालाय, सण कोठून करणार?

By Admin | Updated: November 1, 2015 21:50 IST2015-11-01T21:49:05+5:302015-11-01T21:50:15+5:30

कलावंतांची व्यथा : गावोगावच्या दौऱ्यांतच सरते दिवाळी; फटाके, नवीन कपडे दूरच, गोडधोडही मिळते नशिबानेच

Just a 'Tamasha' of life, from whom will the festival? | अवघ्या आयुष्याचा ‘तमाशा’ झालाय, सण कोठून करणार?

अवघ्या आयुष्याचा ‘तमाशा’ झालाय, सण कोठून करणार?

नाशिक :वर्षातले दोन-पाच महिने गावोगावी हिंडावे, बाजार-जत्र्यात तमाशाचे खेळ करावेत, मिळतील ते पैसे जमवावेत आणि त्यातून वर्षभर कुटुंबाच्या पोटाची आग शमवावी... आयुष्याचे हेच चक्र होऊन बसलेल्या ‘त्यांना’ सण कधी येतो, कधी जातो, हे कळतही नाही... सणाविषयी विचारल्यावर त्यांच्या तोंडून फक्त हताश उद्गार बाहेर पडतात, ‘आयुष्याचाच ‘तमाशा’ झालाय, सण कुठून साजरे करणार?’
- ही व्यथा आहे तमाशा कलावंतांची. वर्षानुवर्षांपासूनची ही कला आता पार अस्तंगत होत चालली आहे. राज्यात तमाशाची दहा-पंधरा मोठी मंडळे उरली आहेत. दसरा ते अक्षय्यतृतीया असे सहा-सात महिने त्यांचे कार्यक्रम होतात. छोटी मंडळे मात्र गुढीपाडव्यापासून अक्षय्यतृतीयेपर्यंतच तमाशा करतात. नाशिक जिल्ह्यात अशा वीसेक पार्ट्या आहेत. महाशिवरात्रीनंतर त्यांच्या सुपाऱ्या ठरण्यास प्रारंभ होतो आणि तारखा ठरवल्या जातात. जिथली सुपारी असेल त्या गावी दोन ट्रक, दोन बसेससह दुपारी पोहोचावे, साहित्य उतरवावे, तंबू, स्टेज उभारावेत, रात्री नऊला तमाशा सुरू करावा, तो पाचेक तासांनी संपल्यावर मध्यरात्री पोटात चार घास ढकलावेत आणि जमिनीला पाठ टेकावी... दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा दोन तासांची ‘हाजरी’ (हजेरी) सादर करावी अन् पुढल्या गावाला चालू लागावे, असा या कलावंतांचा दिनक्रम. तमाशात गण, गवळण, रंगबाजी (लावण्या, नृत्ये), वगनाट्य सादर केले जाते, तर दुसऱ्या दिवशीची ‘हजेरी’ ही तमाशाचीच छोटी आवृत्ती असते. फक्त त्यात वगनाट्याऐवजी ‘फार्सा’ (विनोदी नाटिका) सादर केली जाते.
जिल्ह्यात नांदूरशिंगोटे, येवला या भागात तमाशाच्या पार्ट्या तग धरून आहेत. मंडळ लहान असले, तरी त्यात ४० ते ४५ माणसांचा कबिला असतो. त्यात स्त्री-पुरुष कलावंत (गायक, वादक, नर्तक, वगनाट्यातील अभिनेते, सोंगाड्या वगैरे), बिगारी, आचारी, ड्रायव्हर असे सारेच आले. या प्रत्येकाचे वेतन रोजावर वा मासिक पगारावर साधारणत: पाचशे ते सातशे रुपये प्रतिदिन या प्रमाणात असते. तमाशाची सुपारी २५ हजारांपासून ते पार दीड लाखापर्यंत दिली जाते. सुपारीच्या रकमेवर कलावंतांची संख्या अवलंबून असते. दोनेक महिन्यांचा हा मोसम पूर्णत: फिरतीवरच काढला जातो. तो आटोपल्यावर उरलेले वर्ष कोणी जागरण-गोंधळ करते, कोणी मोलमजुरी, तर कोणी मोठ्या पार्टीत जाऊन काम करते.
तमाशा पार्टीचा मालक असो की कलावंत, दोघेही समदु:खीच. चाळीसेक व्यक्तींचे वेतन देणे मालकाला परवडत नाही. मोसम सुरू होण्यापूर्वी सगळ्या कलावंतांना ठिकठिकाणाहून खास सरावासाठी पंधरा दिवस आधी बोलवावे लागते, त्यांची निवास-भोजनाची व्यवस्था करावी लागते. तमाशाच्या आयोजक मंडळीकडून अनेकदा ठरलेले पैसेही ‘कार्यक्रम रंगला नाही’चे कारण पुढे करीत दिले जात नाहीत. अशा एक ना अनेक व्यथा. त्यामुळे अनेक कार्यक्रम करूनही हातात पैसा उरत नाही.
मालकच विपन्नावस्थेत असेल, तर कलावंतांची अवस्था सांगायलाच नको; पण या कलावंतांना- विशेषत: महिलांना दारिद्र्याच्या चटक्यांबरोबर समाजाचा तिरस्कारही सहन करावा लागतो. रस्त्याने चालतानाही ‘तमाशावाली’ किंवा ‘नाचणारी’ आली’, असे टोमणे ऐकावे लागतात. त्यांच्याकडे हमखास वाईट नजरेने पाहिले जाते. कलावंतांच्या मुलांनाही ‘तमासगीराचा पोर तू, शिकून काय कलेक्टर व्हनार का’, अशी शेरेबाजी ऐकावी लागते.
सतत फिरतीवर असल्याने कलावंतांना साध्या तारखाही आठवत नाहीत, तेव्हा सणाची गोष्ट दूरच राहते. दिवाळीच्या दिवशी मात्र राहुटीत लक्ष्मीपूजन केले जाते, कोणी बाहेरून गोडधोड आणते. तेवढेही पैसे नसतील, तर तंबूतच शिरा परतवला जातो. मुले-बायका गावी असल्याने नवे कपडे तर सोडा; पण त्यांना आपल्या माणसाचा चेहराही महिनोन् महिने दृष्टीस पडत नाही.
महाराष्ट्रातील एकेकाळचे प्रख्यात तमाशा कलावंत दिवंगत दत्ता महाडिक यांचे चिरंजीव विनायक महाडिक यांचे नांदूरशिंगोटे येथे तमाशा मंडळ आहे. ते सांगतात, ‘तमाशा कलावंताला अनेकदा चहासुद्धा मिळत नाही. स्मशानाच्या कडेला बसून पोटात चार घास ढकलावे लागतात, तो काय सण साजरा करणार? फटाके, कपडे हे सगळे श्रीमंतांचे चोचले आहेत. त्यांना सण आल्यावर आनंद होतो. पोटासाठी गावोगाव हिंडणाऱ्या कलावंताला मात्र सण आल्यावर काळजीच जास्त वाटते...’
- त्यांच्या शब्दांतून माणसांच्या एका उपेक्षित समूहाची व्यथाच नुसती उलगडतच नाही, तर ती संवेदनशील माणसाच्या काळजाला घरेही पाडते!

Web Title: Just a 'Tamasha' of life, from whom will the festival?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.