न्यायप्रविष्ट प्रकरण : निळ्या रेषेत बांधकामाला आक्षेप
By Admin | Updated: April 26, 2017 01:46 IST2017-04-26T01:46:02+5:302017-04-26T01:46:22+5:30
नासर्डी नदीला संरक्षकभिंत बांधण्यास हरकत

न्यायप्रविष्ट प्रकरण : निळ्या रेषेत बांधकामाला आक्षेप
नाशिक : शहरातील नद्यांच्या निळ्या पूररेषेतील बांधकामे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असताना त्याची अंमलबजावणी सोडाच उलट पक्षी महापालिकाच नासर्डी नदीपात्रात भराव टाकून संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. या बांधकामास पर्यावरणप्रेमी राजेश पंडित यांनी आक्षेप घेतला असून, भराव त्वरित हटवावा अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.
मनसेच्या काळात रेटून मंजूर झालेल्या या भिंतीच्या कामाला त्यामुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे. गेल्या पंचवार्षिक कारकिर्दीत मनसेने हा प्रस्ताव मांडला तेव्हा त्यावेळी सुमारे सात कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यास अनेकांनी विरोध केला होता. नदीपात्रात भराव करून जमीन तयार करणे आणि त्या माध्यमातून नदीप्रवाहाला अवरोध करण्याच्या या कामाविषयी शंका घेतली जात होती. परंतु तरीही मंजूर झालेल्या कामाला अलीकडेच मुहूर्त लागला असून, नदीपात्रालगत वेगाने काम सुरू आहे. आता या कामालाच आक्षेप घेण्यात आला आहे.
गोदावरी नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. या अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाने ३० मार्च रोजी झालेल्या सुनावणीत निळ्या पूररेषेतील आणि नदीपात्रातील सर्व अनधिकृत बांधकामे हटविण्याचे आदेश दिले होते; मात्र सध्या नदीपात्रात हॉटेल किनारा (मुंबई नाका) ते नाशिक-पुणे रोड दरम्यान अनेक ठिकाणी नदीपात्रात भराव टाकून संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी निरीने दिलेल्या सूचना व आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे या बांधकामामुळे उल्लंघन होत आहे, असे राजेश पंडित यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. नदीपात्रात चालू असलेले काम त्वरित थांबवावे, तसेच नदीपात्रात काहीही बांधकाम करायचे असल्यास निरी आणि उच्च न्यायालयाच्या परवानगीनेच करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.