कनिष्ठ महाविद्यालय : परीक्षेवरील असहकार कायम
By Admin | Updated: March 14, 2017 00:35 IST2017-03-14T00:35:32+5:302017-03-14T00:35:44+5:30
शासन निर्णयाकडे शिक्षकांचे लक्ष

कनिष्ठ महाविद्यालय : परीक्षेवरील असहकार कायम
नाशिक : कायम विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेजांचा कायम शब्द काढण्यात यावा यांसह विविध मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक महासंघाने बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीबाबत पुकारलेला असहकार कायम आहे. गेल्या शुक्रवारी शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर याबाबत शासन काय निर्णय घेते याकडे महासंघाचे लक्ष लागले आहे.
कायम शब्द काढून शंभर टक्के अनुदान द्यावे, वैयक्तिक मान्यतेची कामे तत्काळ करावीत, सेवा शर्ती लागू कराव्यात अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील कनिष्ठ शिक्षकांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. गेली दहा-बारा वर्षांपासून राज्यातील हे शिक्षण कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळेवर कार्यरत आहेत. अशा प्राध्यापकांची संख्या २१ हजारांच्या घरात आहे. वारंवार आंदोलन करूनही शासन दुर्लक्ष करत असल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.
माहिती तंत्रज्ञान विषयातील शिक्षकांना अनुदान मिळावे, हायस्कूल नियमाप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना २० टक्के अनुदान मिळावे, अशी मागणी आहे. मागण्यांचा विचार होईपर्यंत बारावी परीक्षेच्या कामजावरील बहिष्कार कायम असल्याचे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय महासंघाने म्हटले आहे.
या बैठकीला कनिष्ठ महाविद्यालय महासंघाचे अनिल देशमुख, सरचिटणीस संजय शिंदे, कार्याध्यक्ष अविनाश तळेकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)