अधिकाऱ्यांची ‘पास’साठी घालमेल

By Admin | Updated: August 26, 2015 23:39 IST2015-08-26T23:37:10+5:302015-08-26T23:39:55+5:30

सेक्टर प्रमुखही वंचित : पोलीस यंत्रणेवर नाराजी

Joining the officers 'pass' | अधिकाऱ्यांची ‘पास’साठी घालमेल

अधिकाऱ्यांची ‘पास’साठी घालमेल

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा पर्वणी दोन दिवसांवर तर त्यासाठी रस्त्यांची नाकाबंदी करण्याची वेळ चोवीस तासांवर येऊन ठेपलेली असतानाही पर्वणीच्या कामासाठी जुंपलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना अद्यापही पोलीस प्रशासनाकडून ‘पासेस’ वितरित न करण्यात आल्याने समस्त शासकीय अधिकाऱ्यांची घालमेल वाढली आहे. पर्वणी काळात ७२ तास कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश प्रशासनाने यापूर्वीच अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलेले असल्याने कर्तव्यावर हजर होण्यासाठी पोलीस बंदोबस्त पार करून कार्यालय कसे गाठावे असा प्रश्न सर्वांनाच पडला असून, पोलिसांकडून केल्या जात असलेल्या अडवणुकीबाबत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार करण्यात आली आहे.
कुंभमेळ्याच्या कामांशी संबंधित सर्वच यंत्रणांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची ही व्यथा असून, गुरुवारी दिवसभर ‘पास’ साठी विचारणा करणाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात रीघ लागली होती. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तालयाकडून पास देण्यात येणार असल्याने पर्वणी काळात विविध जबाबदाऱ्यांवर नेमलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नाव, पत्ता, छायाचित्रासह याद्या तयार करण्यात आल्या व त्या पोलीस यंत्रणेकडे सोपविण्यात आलेल्या असल्या तरी अद्यापही त्याची पूर्तता झालेली नाही.
गेल्या तीन दिवसांपासून सेक्टर अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांना बाह्य व अंतर्गत वाहनतळ तसेच स्नानाचे ठिकाण, प्रशासकीय मार्ग, भाविक मार्ग या ठिकाणी जाऊन पाहणी तसेच सोयी, सुविधांचा आढावा घ्यावा लागत आहे. अशा वेळी त्यांची शासकीय वाहनेदेखील पोलिसांकडून अडवून त्यांना ‘पास’ बाबत विचारणा केली जात असल्याने या अधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केलेली आहे.
एकीकडे प्रशासनाने सोपविलेल्या जबाबदारीचे पालन करण्याची चिंता लागून दुसरीकडे कर्तव्यात कसूर केल्याबद्दल शिक्षेची टांगती तलवारही कायम आहे. अशा परिस्थितीत कर्तव्याचे ठिकाण वा कार्यालय कसे गाठावे याची काळजी केली जात आहे.
शुक्रवारी पहाटे सहा वाजेपासून पोलिसांकडून शहरातील रस्त्यांचा ताबा घेतला जाणार असल्याने अशा वेळी कार्यालय कोणत्या रस्त्याने वेळेत गाठावे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Joining the officers 'pass'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.