नाताळसाठी ‘जिंगल बेल’
By Admin | Updated: December 6, 2015 22:31 IST2015-12-06T22:31:06+5:302015-12-06T22:31:58+5:30
विक्रीसाठी दाखल : बाजारपेठा सजल्या; चर्चवर रोषणाई

नाताळसाठी ‘जिंगल बेल’
पूर्वा सावजी, नाशिक
ख्रिस्ती बांधवांच्या दृष्टीने महत्त्वाचा सण असलेल्या नाताळची तयारी आता सुरू झाली आहे. शहरातील प्रमुख चर्चमध्ये यासाठी सजावटीचे आणि गव्हाणीचे काम सुरू झाले आहे. शिवाय बाजारपेठेत आकर्षक भेटवस्तू, भेटकार्डे आणि जिंगल बेल्स विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
नाताळ म्हणजे येशूचा जन्मोत्सव. हा सण नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोे. दरवर्षीप्रमाणे यंदाही २५ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नाताळचा उत्साह जाणवण्यास सुरुवात झाली आहे. शहरात संत आंद्रिया, होली क्रॉस आणि सेंट थॉमस हे प्रमुख चर्च आहेत. नाशिकरोड येथेही अनेक चर्च आहेत. पैकी शहरातील चर्चमध्ये सध्या नाताळची जय्यत तयारी सुरू आहे. सर्व चर्चमध्ये साफसफाई आणि रंगरंगोटीची कामे सुरू आहेत. तसेच विद्युत रोषणाई आणि अन्य सजावटीच्या साधनांनी ते सजावण्यात येणार आहेत. सर्वच चर्चमध्ये येशूच्या जन्माचा देखावा सादर केला जातो. तो तयार करण्याचे आणि सजावटीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. चर्चमध्येच नव्हे तर अनेक ख्रिश्चन बांधव आपल्या घरी अथवा वसाहतीतही अशा प्रकारच्या जन्मोत्सवाच्या गव्हाणी तयार करतात. त्यांचीही तयारी सुरू आहे.
शहरातील भेटवस्तूंच्या दुकानांतही ख्रिसमसचा प्रभाव जाणवू लागला आहे. अनेक आकर्षक भेटवस्तू आणि शुभेच्छा काडर््स, जिंगल बेल, ख्रिसमस ट्रीची प्रतिकृती, फुगे आणि अन्य सजावटीचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. तसेच खास ख्रिसमस केक, पेस्ट्रीज, चॉकलेट्सही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक वस्तूची किंमत त्याचा आकार आणि दर्जानुरूप आहे. अनेक दुकानदारांनी ख्रिसमससाठी फेस्टिव्हल आॅफर्स आणल्या आहेत. त्यामुळे सवलतीच्या दरातही साधने उपलब्ध आहेत.
सांताक्लॉजची क्रेझ
ख्रिसमसच्या आदल्या दिवशी मध्यरात्री सांताक्लॉज येतो आणि झोपलेल्या लहानग्यांना खेळणी भेटवस्तू देऊन जातो, असे रंजकपणे मुलांना सांगितले जाते. बाजारपेठेत विविध आकारांत सांताक्लॉजचे मुखवटे विक्रीसाठी आले असून, त्याच्या कॅप्सही पन्नास रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.