ज्येष्ठ लेखिका जयश्री खिरे यांचे निधन

By Admin | Updated: July 29, 2016 00:41 IST2016-07-29T00:39:26+5:302016-07-29T00:41:22+5:30

ज्येष्ठ लेखिका जयश्री खिरे यांचे निधन

Jayshree Khare passes away | ज्येष्ठ लेखिका जयश्री खिरे यांचे निधन

ज्येष्ठ लेखिका जयश्री खिरे यांचे निधन

नाशिक : येथील प्रसिद्ध लेखिका, कादंबरीकार प्रा. जयश्री दिगंबर खिरे (८१) यांचे गुरुवारी सकाळी ८ वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या रूपाने शहरातील चतुरस्र साहित्यिक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
खिरे या गेल्या दोन वर्षांपासून आजारी होत्या. तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. अखेर गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती दिगंबर खिरे आहेत. सन १९३५ मध्ये मुंबईत जन्मलेल्या खिरे यांनी मराठीत एमए केले होते. विवाहानंतर त्या नाशिकला स्थायिक झाल्या. त्यांनी काही काळ केटीएचएम महाविद्यालयात अध्यापन केले. अमृत, सत्यकथा, स्त्री, माहेर, राजहंस, माणूस यांसारख्या प्रतिष्ठित नियतकालिकांत त्यांनी सातत्याने लेखन केले. हिरवे क्षण, मोतिया, तरंग हे त्यांचे कथासंग्रह, काचरंग, काहिली, धुव्वाधार, वादळडोळा, मनमोगरी, उन्हातली घरे या कादंबऱ्या, रंगरेषा हे ललित लेखांचे पुस्तक, व.. व.. वाघाचा, रथाचा सारथी ही बालनाट्ये असे त्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे. पैकी सन १९८९ मध्ये वादळडोळा, तर सन २००० मध्ये रंगरेषा या त्यांच्या पुस्तकाला राज्य शासनाचा उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा पुरस्कार लाभला होता. त्यांच्या काही कथांचे जर्मन भाषेतही अनुवाद झाले. सार्वजनिक वाचनालय, संवाद या संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. सन २००६ मध्ये झालेल्या सावानाच्या ३९ व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या त्या अध्यक्षा होत्या. ‘साहित्य रसिका’ या संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या.
दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर नाशिक अमरधाम येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Jayshree Khare passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.