जानोरीचे बीएसएनएल कार्यालय सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 00:08 IST2021-04-10T23:56:58+5:302021-04-11T00:08:26+5:30
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीने भाडेवसुलीसाठी बीएसएनएल कंपनीचे जानोरी येथील कार्यालय सील केले आहे.

जानोरीचे बीएसएनएल कार्यालय सील
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीने भाडेवसुलीसाठी बीएसएनएल कंपनीचे जानोरी येथील कार्यालय सील केले आहे.
जानोरी येथील बीएसएनएल कंपनीचे कार्यालय ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालय इमारतीत गेल्या वीस वर्षांपासून भाडे तत्त्वावर सुरू होते, परंतु बीएसएनएल कंपनीने गेल्या आठ वर्षांपासून ग्रामपंचायतीला भाडेतत्त्वावर ठरलेली रक्कम अदा न केल्याने, जानोरीच्या सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके व ग्रामपंचायत सदस्य यांनी भाडे वसुलीची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला आदेश दिले. त्यानुसार, ग्रामपंचायतीने धडक कारवाई करीत बीएसएनएलचे कार्यालय सील केले आहे. बीएसएनएल कंपनीच्या ठरलेल्या भाड्यापैकी १ लाख ७४ हजार ५०० रुपये थकबाकी होती. याबाबत ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी के.के. पवार यांनी कंपनीशी याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार केला, परंतु कंपनी प्रशासनाने याबाबत कुठलीही दखल न घेतल्याने, अखेर जानोरी ग्रामपंचायतीने बीएसएनएलचे कार्यालय सील केले आहे.