रामनामाच्या जयघोषात जन्मोत्सव
By Admin | Updated: April 5, 2017 00:29 IST2017-04-05T00:28:40+5:302017-04-05T00:29:46+5:30
काळाराम मंदिर : ढोल ताशांचा गजर, हजारो भाविक नतमस्तक, महिला भक्तांनी म्हटले पाळणा गीत

रामनामाच्या जयघोषात जन्मोत्सव
नाशिक : सियावर रामचंद्र की जय, जय सीता राम, जय जय सीता राम असा रामनामाचा जयघोष करीत श्री काळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावर्षाचे उत्सव मानकरी चंदनबुवा पूजाधिकारी यांच्या हस्ते परंपरागत पूजेनंतर रामजन्म होताच भाविकांनी गुलालाची उधळण करून ढोल ताशांच्या गजरात साखर, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल आदिंसह संस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.
रामजन्मोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. ४) काळाराम मंदिरात दिवसभर उत्साहाच्या आणि भक्तिमय वातावरणात रामनामाचे स्मरण व भजन केले. पहाटे मंगेशबुवा पुजारी यांच्या हस्ते काकड आरती करण्यात आली. त्यानंतर यावर्षाच्या उत्सवाचे मानकरी चंदन पूजाधिकारी यांच्या हस्ते मुख्य महान्यास पूजा करण्यात आली. पूजेच्या साहित्याची पारंपरिक पद्धतीने रामनाम आधाराश्रमापासून मिरवणूक काढून महावस्त्र मंदिरात आणण्यात आले. महावस्त्र व अलंकारांची विधिवत व परंपरागत पद्धतीने पूजा करून प्रभू रामचंद्रांना नवे वस्त्र, अलंकार व सोन्याचा मुकुट चढविण्यात आला. दुपारी बारा वाजता रामजन्मोत्सव साजरा झाला. रामजन्म होताच मंदिराच्या आवारात महिलांनी ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला’ पाळणागीत गाऊन आनंदोत्सव साजरा केला. जन्मसोहळा पूर्ण होताच मंदिराच्या गाभाऱ्यात जमलेल्या रामभक्तांनी रामनामाचा जयघोष केला. (प्रतिनिधी)