वाजगावचे जनता विद्यालय बंद होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:09 IST2017-08-23T01:09:08+5:302017-08-23T01:09:12+5:30
तालुक्यातील वाजगाव येथील जनता विद्यालय संस्थेने दुर्लक्ष केल्यामुळे सातत्याने कमी होत चाललेल्या विद्यार्थीसंख्येमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

वाजगावचे जनता विद्यालय बंद होण्याच्या मार्गावर
देवळा : तालुक्यातील वाजगाव येथील जनता विद्यालय संस्थेने दुर्लक्ष केल्यामुळे सातत्याने कमी होत चाललेल्या विद्यार्थीसंख्येमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. नाशिक जिल्हा विधायक कार्य समिती सटाणा या संस्थेने सन २००९ मध्ये वाजगाव येथे जनता विद्यालय सुरू केले होते. गावात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंतची शिक्षणाची सोय असल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना देवळा, खर्डा, रामेश्वर आदी गावांत पुढील शिक्षणासाठी जावे लागत होते. गावातील आदिवासी विद्यार्थ्यांना मात्र इतर गावात शिक्षणासाठी जाणे आर्थिकदृष्ट्या गैरसोयीचे ठरू लागले होते. त्यामुळे हे विद्यार्थी इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेऊन पुढे शाळा सोडून देत. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. विधायक कार्य समितीने वाजगाव येथे जनता विद्यालय सुरू केल्यामुळे इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत गावात शिक्षणाची सोय झाली. गावकºयांनी शाळेला वर्गखोल्यांसाठी गावातील समाजमंंिदर व ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीची जागा उपलब्ध करून दिली. शाळेला पालकांनी चांगला प्रतिसाद देत आपले पाल्य शाळेत दाखल केले. सुरुवातीला तीन तुकड्यांची मिळून एकूण ८० च्या आसपास पटसंख्या होती. सन २०१०-११ मध्ये एसएससी बोर्डाने शाळेला सांख्येतांक दिला आहे. त्या वेळेस संस्था विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरवेल व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल अशा अपेक्षेत पालक होते. परंतु कालांतराने पालकांचा भ्रमनिरास झाला. विधायक कार्य समितीने शाळेच्या सुधारणेच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. विना अनुदानित असलेल्या या शाळेत अवघे दोन शिक्षक आहेत. हे दोन शिक्षक तीनही इयत्तांना गणित, विज्ञान, मराठी व समाजशास्त्र हे विषय शिकवतात. पेसाअंतर्गत येणाºया या शाळेत पाच शिक्षकांची आवश्यकता आहे. संस्थेच्या खर्डा येथील शाळेतील शिक्षक हिंदी, इंग्रजी विषयांचे आठवडाभरात काही तास घेण्यापुरते तात्पुरती वाजगाव येथील शाळेत हजेरी लावत वेळ निभावून नेतात. शाळेला विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, खेळाचे मैदान, शाळेसाठी इमारत आदी कोणतीही सुविधा विधायक कार्यसमिती संस्था अद्यापपर्यंत देऊ शकलेली नाही. या गोष्टीचा विपरीत परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागल्यामुळे पालकांनी आपले पाल्य शाळेत पाठवण्याऐवजी इतर शाळांत दाखल करण्यास सुरुवात केली. यामुळे शाळेतीत विद्यार्थीसंख्या रोडावू लागली व शाळा बंद पडण्याच्या मार्गाला लागली आहे. शाळेत सध्या आदिवासी, व इतर मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांची पटसंख्या ५०च्या आत आहे, परंतु प्रत्यक्ष शाळेत अवघे १९ विद्यार्थी नियमितपणे येतात. इयत्ता आठवी - ५ विद्यार्थी, इयत्ता नववी - ३ विद्यार्थी, व इयत्ता दहावी - १३ विद्यार्थी नियमित शाळेत येतात. हे आदिवासी विद्यार्थी शाळा बंद पडली तर शिक्षण घेण्यापासून वंचित राहणार आहेत.