वीरगाव येथे जेलभरो; रास्ता रोको आंदोलन
By Admin | Updated: September 16, 2015 00:06 IST2015-09-16T00:05:38+5:302015-09-16T00:06:10+5:30
वीरगाव येथे जेलभरो; रास्ता रोको आंदोलन

वीरगाव येथे जेलभरो; रास्ता रोको आंदोलन
वीरगाव : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जेलभरो आंदोलनाला वीरगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनाचे नेतृत्व पंचायत समितीचे उपसभापती वसंत भामरे यांनी केले. यावेळी जेलभरो आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
सकाळी ११ वाजता वीरगाव फाट्यावर विंचूर-प्रकाशा राज्यमार्ग अडवून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनास सुरुवात केली. यावेळी परिसरातील सुमारे पंधरा गावांतील शेकडो शेतकरीवर्गाने बैलगाड्यांसह हजेरी लावल्याने महामार्ग सुमारे अर्धा तास जाम झाला होता. शेतकरीवर्गाचे संपूर्ण कर्ज माफ करावे, संपूर्ण नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करावा व उपाययोजना करण्यात याव्यात, या मागणीच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या .
यानंतर मंडल अधिकारी भगवान सोनवणे यांना निवेदन देऊन याप्रश्नी सरकारने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी वीरगावचे उपसरपंच संजय बच्छाव, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य एस. टी. देवरे, माजी सरपंच ज्ञानेश्वर देवरे, अशोक देवरे, शिवाजी देवरे, दगा सावळा, दिलीप देवरे, वटारचे अनिल पाटील, चेअरमन बाजीराव देवरे, हेमंत गांगुर्डे, कडू अहिरे, हरी मोरे, प्रशांत बागुल, साईनाथ देवरे, हरिभाऊ खैरनार, टीनू देवरे, शरद भामरे आदिंसह परिसरातील शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने हजर होते. (वार्ताहर)