आदिमायेचा आजपासून जागर
By Admin | Updated: October 13, 2015 00:06 IST2015-10-13T00:05:02+5:302015-10-13T00:06:24+5:30
नवरात्रोत्सव : ग्रामदैवत कालिकामाता यात्रोत्सवाची तयारी पूर्ण

आदिमायेचा आजपासून जागर
नाशिक : आदिशक्तीच्या जागराचा उत्सव असलेल्या नवरात्रोत्सवास उद्यापासून (दि. १३) प्रारंभ होत असून, शहरात सणाची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या घरोघरी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना केली जाणार असून, शहरातील देवी मंदिरेही गजबजणार आहेत. नाशिकची ग्रामदेवता असलेल्या कालिकामातेच्या यात्रेला उद्यापासून प्रारंभ होणार आहे. यानिमित्त शहरात जणू चैतन्यपर्वच अवतरणार
आहे.
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमीपर्यंत नवरात्रोत्सव भक्तिभावात साजरा केला जातो. यानिमित्त घरोघरी घट बसवले जातात. टोपलीत काळी माती पसरून त्यावर मातीचाच घट ठेवला जातो. त्यात पाणी टाकून विड्याच्या पानांवर नारळ ठेवला जातो. त्याखाली मातीत सप्तधान्य पेरले जाते.
नऊ दिवसांत त्या धान्याला येणारे अंकुर देवीला अर्पण केले जातात. प्रत्येक दिवशी त्यावर फुलांची माळ चढविली जाते. ग्रामीण भागात रात्री जागरण केले जाते, जोगवाही मागितला
जातो. प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती नऊ दिवस उपवास करते. दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला घट व साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. झेंडूच्या फुलांनाही मोठी मागणी होती. (प्रतिनिधी)