गड-किल्ल्यांच्या स्वच्छतेचा ‘जागर’!
By Admin | Updated: September 24, 2016 01:20 IST2016-09-24T01:15:57+5:302016-09-24T01:20:14+5:30
मनमाड : पुरातत्व विभागाच्या आवाहनाला स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गड-किल्ल्यांच्या स्वच्छतेचा ‘जागर’!
गिरीश जोशी ल्ल मनमाड
राज्य संरक्षित व राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेल्या गड- किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला खासगी व स्वयंसेवी संस्था तसेच शाळ-महाविद्यालयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने प्राचीन वास्तुशास्त्राचे नमुने, ऐतिहासिक स्थळे आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या विभागातील पाच किल्ले व गडांवर स्वच्छतेचा जागर घुमला आहे.
महाराष्ट्र अगदी प्राचीन काळापासून वीरांची भूमी म्हणून ओळखला जातो. राज्यातील गड- किल्ले हे जनतेच्या अस्मितेचे प्रतीक बनले आहेत. ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ असे या राज्याचे वर्णन करण्यात आले आहे. राज्याचा राकटपणा कणखर आणि दणकट दगडांच्या वास्तू किल्ल्यांच्या रूपाने आजही टिकून आहेत. या किल्ल्यांची देखभाल, जतन व संवर्धन करणे व त्यांची स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने १६ सप्टेंबर ते १६ आॅक्टोबर २०१६ या कालावधीमध्ये राज्य संरक्षित स्मारक व राष्ट्रीय संरक्षित स्मारकांवर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या व या विषयात कार्य करू इच्छिणाऱ्या संस्था व व्यक्तींना सहभागी करून घेण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. यास चांगला प्रतिसाद मिळाल्याने स्थानिक पातळीवरील स्वयंसेवी संस्था तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम व स्वच्छतेसाठी जनजागृती करण्यात आली आहे.
याचाच एक भाग म्हणून पुरातत्व विभाग नाशिक यांच्या अंतर्गत राज्य संरक्षित स्मारक व राष्ट्रीय संरक्षित स्मारक असलेल्या मनमाडजवळील अनकाई टनकाई किल्ला, मालेगाव किल्ला, गाळण (ता. मालेगाव) येथील किल्ला, खर्डा (जि. अहमदनगर) येथील किल्ला, पारोळा (जि. जळगाव) या पाच किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. अनकाई टनकाई किल्ल्यावरील स्वच्छता मोहिमेसाठी मनमाड इंजिनिअर्स असोसिएशन व अहल्याबाई होळकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. किल्ला परिसरातील घाण-कचरा, प्लॅस्टिक रिकामी पाकिटे आदि कॅरीबॅगमध्ये गोळा करून विल्हेवाट लावण्यात आली.
यावेळी इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष अमोल गांगुर्डे, राजेश भावसार, स्वप्नील सूर्यवंशी, सुलतान शेख, शिरीश पगार, राजेश पाटील, जीतेश अरोरा, सम्यक लोढा, मुराद शेख, अदनान शहा, इरफान कुरेशी आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. श्रीकांत घारपुरे, तंत्र सहायक अमोल गोटे, जतन सहायक रमेश कुलकर्णी यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
नाशिक विभागातील पाच किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम
४पुरातत्व विभाग नाशिक यांच्या अंतर्गत राज्य संरक्षित स्मारक व राष्ट्ीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित असलेल्या मनमाडजवळील अनकाई- टनकाई किल्ला, मालेगाव किल्ला, गाळण (ता. मालेगाव) येथील किल्ला, खर्डा (जि. अहमदनगर) येथील किल्ला, पारोळा (जि. जळगाव) या पाच किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. श्रीकांत घारपुरे, तंत्र सहायक अमोल गोटे, जतन सहायक रमेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची मोहीम राबवण्यात आली.