उद्यानात प्रवेश करताच लागतो ठसका...

By Admin | Updated: May 10, 2015 23:28 IST2015-05-10T23:28:35+5:302015-05-10T23:28:53+5:30

अक्षम्य दुर्लक्ष : उद्यानांची कमालीची दुर्दशा अन् ‘गार्डन सिटी’ची आशा

It's time to enter the park ... | उद्यानात प्रवेश करताच लागतो ठसका...

उद्यानात प्रवेश करताच लागतो ठसका...

नाशिक : गार्डन सिटीची ‘मनसे’ आशा बाळगणाऱ्या राज ठाकरे यांच्या पक्षाची सत्ता असलेल्या शहरात मध्यवर्ती ठिकाणांच्या जुन्या उद्यानांचे तीन तेरा झाले आहेत. मोडकळीस आलेल्या खेळण्या, अस्वच्छता, बाकांची दुरवस्था अशा एक ना अनेक समस्यांचे ग्रहण शहराच्या उद्यानांना लागले आहे. नेहरू उद्यानदेखील याला अपवाद नाही. संध्याकाळी या उद्यानात प्रवेश करतानाच बालगोपाळांना व त्यांच्या पालकांना ठसक्याचा त्रास सहन करावा लागतो; मात्र याबाबत पालिकेला अद्याप तोडगा काढणे शक्य झालेले नाही.
नेहरू उद्यानाभोवती संध्याकाळच्या सुमारास चायनिज विक्रेत्यांचा गराडा असतो. त्यामुळे रामप्यारीबाई सारडा शाळा ते थेट परशुराम साईखेडकर नाट्यगृहापर्यंत वाहतुकीची कोंडी पहावयास मिळते. कारण या विक्रेत्यांकडे येणाऱ्या ग्राहकांकडून थेट रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जातात. तसेच उद्यानाचे प्रवेशद्वार नेमके कोठून आहे, हेदेखील नागरिकांना लक्षात येत नाही. उद्यानाच्या उंबरठ्यापासून तर थेट संपूर्ण संरक्षक भिंतींपर्यंत चायनिज विक्रेत्यांचे वाढते अतिक्रमण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
दरम्यान, सायंकाळच्या वेळेस उद्यानात खेळणाऱ्या बाळगोपालांना तसेच पालकांनाही चायनिजच्या तडक्याचा ठसका व दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. यावेळी तडक्याचा धूर डोळ्यात जाऊन डोळे चुरचुरणे तसेच नाका-तोंडात हा धूर जाऊन येणारा ठसका यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. संध्याकाळच्या वेळेस नेहरू उद्यानाचा परिसर मोकळा श्वास कधी घेणार या प्रश्नाचे उत्तर ना पालिके च्या अतिक्रमण निर्मूलन विभाग ना पोलीस ना दस्तुरखुद्द पालिकेच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखांकडे आहे.

Web Title: It's time to enter the park ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.