सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत
By Admin | Updated: January 13, 2017 00:30 IST2017-01-13T00:29:53+5:302017-01-13T00:30:07+5:30
चढाओढ : माजी आमदारांची भूमिका ठरणार निर्णायक

सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत
सचिन कोठावदे ताहाराबाद
ताहाराबाद जिल्हा परिषद गटासह ताहाराबाद व अंतापूर पंचायत समिती गण अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने विद्यमान सदस्यांसह अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले असून, गटात काँग्रेस, तर पंचायत समिती गणात भाजपा व राष्ट्रवादीचे सदस्य निवडून गेले होते. माजी आमदार दिलीप बोरसे व माजी आमदार उमाजी बोरसे यांचाही या गटावर चांगला प्रभाव आहे. यावेळी त्यांची भूमिका निर्णायक राहील.
संमिश्र समतोल साधणारा गट व दोन्ही पंचायत समिती गण म्हणून उल्लेख करावा लागेल. कारण सर्वपक्षीय वरिष्ठ पदाधिकारी या भागातील असल्याने सर्वपक्षीय ताकदीचा गट म्हणून तालुक्यात या गटाची ओळख आहे.
हा गट नव्याने अस्तित्वात आल्यानंतर झालेल्या निवडणुकीत गटासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण झाले. भाजपाकडून सीमा किशोर भामरे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून चित्रा ज्ञानेश्वर नंदन, तर काँग्रेसकडून (कै.) सुशीला प्रभाकर सोनवणे यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपाच्या सीमा भामरे यांनी विजय मिळविला. ताहाराबाद पंचायत समिती गणात अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या आरक्षणावर भाजपाचे नारायण माळी व काँग्रेसचे यशवंत पवार यांच्यात सरळ लढत झाली. यात पवार यांचा निसटता पराभव होऊन माळी यांनी विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माळी तिसऱ्या स्थानावर होते. अंतापूर पंचायत समिती गणात काँग्रेस- भाजपात सरळ लढत होऊन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (कै.) श्यामकांत पवार यांनी एकतर्फी विजय मिळवत भाजपाचे अभय पवार यांचा पराभव केला होता. दरम्यान, श्यामकांत पवार यांचे अकाली निधन झाल्याने या गणात पोटनिवडणूक लागली होती. या पोटनिवडणुकीत कै. पवार यांच्या घरातील उमेदवार निवडणूक रिंगणात उभा करून त्यास बिनविरोध निवडून देण्याचा सर्वपक्षीय नेत्यांचा प्रयत्न झाला. मात्र ऐनवेळी भाजपाने श्यामकांत पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे यशवंत अहिरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकून बिनविरोध निवडीची गणिते बदलली. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (कै.) नानाभाऊ शिंदे यांना पक्षाने उमेदवारी दिली; मात्र निवडणुकीत भाजपाचे अहिरे यांचा विजय झाला होता.
यंदाच्या निवडणुकीत ताहाराबाद जिल्हा परिषद गट अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला असल्याने विद्यमान सदस्य डॉ. प्रशांत सोनवणे यांच्यासह अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. गेल्या निवडणुकीत डॉ. सोनवणे यांच्या माध्यमातून काँग्रेसने भाजपाच्या ताब्यातून गट आपल्याकडे खेचला होता. या निवडणुकीत इच्छुकांची संख्या तशी जेमतेम असली, तरी सर्व बाजूंनी सक्षम उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न चालला आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय भामरे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुभाष नंदन हे ताहाराबाद गावात वास्तव्यास आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे हेही तांदूळवाडी या पाच किमी अंतरावरील गावात वास्तव्यास आहेत. चौघे प्रमुख पदाधिकारी ताहाराबाद गटाशी संलग्न असल्याने चारही पक्षांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे. यापूर्वी गटातून माजी आमदार उमाजी बोरसे, साखरचंद कांकरिया यांनी या गटाचे प्रतिनिधित्व केले आहे.