त्याची ‘कठ्याची जत्रा’ चित्रपट महोत्सवात!
By Admin | Updated: July 12, 2014 00:28 IST2014-07-12T00:15:20+5:302014-07-12T00:28:57+5:30
त्याची ‘कठ्याची जत्रा’ चित्रपट महोत्सवात!

त्याची ‘कठ्याची जत्रा’ चित्रपट महोत्सवात!
आनंद बोरा ल्ल नाशिक
दिंडोरी तालुक्यातील धागोर या गावातील आदिवासी युवक विजयकुमार घोटे याने तयार केलेल्या ‘कठ्याची जत्रा’ या लघुपटाला १२ जुलै रोजी पुणे येथे होणाऱ्या नवव्या आदिवासी फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्थान मिळाले आहे. वेणू नायर, कुंडलिक केदार, विराज मुनोत, डॉ. अजित वाडीकर, सुनीता देशमुख या दिग्दर्शकांबरोबर आपली कलाकृती सादर करण्याची संधी विजयला मिळाली आहे.
नगर जिल्ह्यातील कौठवाडी या गावाची पारंपरिक यात्रा विजयने लघुपटात टिपली आहे. या गावात दरवर्षी विरोबा मंदिरात नवसपूर्तीनिमित्त ‘कठ्याची जत्रा’ भरते. या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे भाविक डोक्यावर पेटते मडके घेऊन आपला नवस पूर्ण करतात. आदिवासी सायंकाळी गावातून कठ्याची मिरवणूक काढतात. यामध्ये शेकडो भाविक सामील होतात. डोक्यावरील गरम झालेले मडके ते शेवटपर्यंत खाली ठेवत नाहीत. दहा मिनिटांच्या या लघुपटासाठी तीस हजार रुपये खर्च आला. विशेष म्हणजे, हा खर्च ग्रामस्थांनीच वर्गर्णीतून उभा केला. चित्रपट बनविण्याचा अनुभव पाठीशी नसताना केवळ इच्छाशक्तीच्या बळावर विजयने हा लघुपट तयार केला आहे.