आसाराम बापू आश्रमातील संचालकाचे अपहरण, मग गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा झाला उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:19 IST2021-09-04T04:19:24+5:302021-09-04T04:19:24+5:30
गुजरात पोलिसांनी मुसक्या बांधलेल्या या आरोपीचे नाव संजीव किशनकुमार वैद (४४) असून तो गंगापूर रोडवरील आसारामबापू आश्रमाच्या गोशाळेतील ...

आसाराम बापू आश्रमातील संचालकाचे अपहरण, मग गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा झाला उलगडा
गुजरात पोलिसांनी मुसक्या बांधलेल्या या आरोपीचे नाव संजीव किशनकुमार वैद (४४) असून तो गंगापूर रोडवरील आसारामबापू आश्रमाच्या गोशाळेतील संचालक असल्याचे सांगण्यात येते. मुळातच आसाराम बापू हा वादाचा विषय, त्यांच्याशी संबंधित व्यक्ती गायब होणे याला वेगळेच महत्त्व आहे. त्यामुळे त्याची अपहरणाची घटना नाशिक पोलिसांनाही हादरवून टाकणारी घडली.
आसाराम बापू आश्रमशाळेच्या गोशाळेतील जनावरांना खाद्य घेण्यासाठी संजीव वैद पंचवटीतील सेवाकुंज येथे नागसेठिया पशुखाद्य दुकानात गेला होता. यावेळी त्याला चार जणांनी मोटारीत बसवून नेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गोशाळेतील वैद याचे सहकारी राजेश चांद्रकुमार डावर यांनी इनोव्हा कारमधून आलेल्या चौघा जणांनी भरदिवसा संजीव वैदचे अपहरण केल्याची फिर्याद पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल केली. या घटनेने पोलीसही सतर्क झाले.
तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रोहीत केदार यांनी घटना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तसेच तपास पथकाला दोन गटांत विभागून वाहनाचा शोध घेण्याकरता घोटी टोलनाका तसेच शिंदे पळसे टोल नाका येथे वाहनाचा माग घेतला. या तपासादरम्यान अपहृत संजीव वैद हा साबरमती पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात बारा वर्षांपासून फरार असल्याचे समोर आले. त्यानंतर अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेसोबत संपर्क करून या माहितीची नाशिक पोलिसांनी पडताळणी करून घेतली असून संजीव वैद याच्यावर साबरमती पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व शस्त्रास्त्र कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी गुन्हे दाखल असून या गुन्ह्यांत तो मागील १२ वर्षांपासून फरार होता. अखेर गुजरात पोलिसांनी त्याला नाशिक येथून ताब्यात घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
इन्फो...
अपहरण झाल्याचा गैरसमज
पंचवटीतील सेवाकुंज येथे नागसेठिया पशुखाद्य दुकानात गेलेल्या संचालक संजीव वैद (४४) याला गुजरात पोलिसांच्या चार सदस्यीय पथकाने अटक केली; परंतु, त्याविषयी गुजरात पोलिसांनी नाशिक पोलिसांना कल्पना दिली नाही की आश्रमातील अन्य कोणालाही माहिती नव्हती. त्यामुळे
आश्रमाचे राजेश चांद्रकुमार डावर यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात चौघाजणांनी भरदिवसा संजीव वैदचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली. अर्थात, अपहरण झाल्याचा झाल्याचा गैरसमज झाला की आश्रमातील संजीव वैद यांच्या सहकाऱ्यांकडून अपहरण झाल्याची चुकीची माहिती पोलिसांना देण्यात आली याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
इन्फो....
नाशिकच्या आश्रमात संजीव वैद हा किती वर्षांपासून काम करीत हाेता, त्याच्या गुन्ह्याविषयी कोणाला माहिती होती काय, याबाबत आता नाशिक पोलीस माहिती घेत आहेत.