काम करत नाही म्हणून जन्मदाताच उठला मुलीच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 11:58 PM2022-01-08T23:58:52+5:302022-01-08T23:59:18+5:30

दिंडोरी : तालुक्यातील देहरेवाडी शिवारातील जंगलात शुक्रवारी (दि. ७) दहावर्षीय मुलीला फासावर लटकविण्याचा प्रयत्न गुराख्यांच्या सतर्कतेमुळे फसला होता. या घटनेचे गूढ वाढले असतानाच, जन्मदाता पिताच आपल्या मुलीच्या जिवावर उठल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दिंडोरी पोलिसांनी अवघ्या बारा तासांत या गुन्ह्याचा छडा लावत मुलीचा पिता रामू धनगरे (रा. मुंगसरे, ता. नाशिक) यास बेड्या ठोकल्या.

As it was not working, the birth mother got up on the girl's life | काम करत नाही म्हणून जन्मदाताच उठला मुलीच्या जिवावर

काम करत नाही म्हणून जन्मदाताच उठला मुलीच्या जिवावर

Next
ठळक मुद्देबारा तासांत छडा : देहरेवाडीच्या जंगलात गळफास देण्याचा प्रयत्न

दिंडोरी : तालुक्यातील देहरेवाडी शिवारातील जंगलात शुक्रवारी (दि. ७) दहावर्षीय मुलीला फासावर लटकविण्याचा प्रयत्न गुराख्यांच्या सतर्कतेमुळे फसला होता. या घटनेचे गूढ वाढले असतानाच, जन्मदाता पिताच आपल्या मुलीच्या जिवावर उठल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दिंडोरी पोलिसांनी अवघ्या बारा तासांत या गुन्ह्याचा छडा लावत मुलीचा पिता रामू धनगरे (रा. मुंगसरे, ता. नाशिक) यास बेड्या ठोकल्या.  मुलगी काम करत नाही, नेहमी भांडण करते, शिव्या देते, या कारणावरून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची बाब तपासात पुढे आली आहे.

शुक्रवारी (दि. ७) दुपारी १२ च्यासुमारास देहरेवाडी जंगलात एका दहावर्षीय मुलीस एकजण झाडाला लटकवून गळफास देत असल्याची घटना उघडकीस आली होती. परिसरातील गुराख्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. त्यानंतर दिंडोरी पोलिसांनी या मुलीस उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, या मुलीला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने या घटनेचे गूढ वाढले होते. याप्रकरणी जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील व पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सहायक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे यांनी तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान, मुंगसरे येथील रामू धनगरे याने गावातील व्हॉट्स-ॲप ग्रुपवर मुलीचा फोटो व बातमी आल्याचे समजताच पोलीस ठाण्यात तसेच नाशिक जिल्हा रुग्णालयात येत ही मुलगी आपलीच असल्याचे सांगितले. तिला कुणीतरी पळवून नेत मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद देखील दिली. मात्र तपासात मुलीच्या पित्यानेच हे कृत्य केले असावे, असा संशय पोलिसांना आला. त्यांनी त्यास गाफील ठेवत तपास सुरू केला. दरम्यान, शनिवारी (दि. ८) सकाळी मुलगी शुध्दीवर आली व तिने आपल्या वडिलानेच मोटारसायकलवरून दरीकडील जंगलाकडे नेत तेथे मारहाण केली व दोरीने गळा आवळला. त्यानंतर आपण बेशुद्ध झाल्याचा जबाब दिला. पोलिसांनीही रामूस पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दिंडोरी पोलीस ठाण्यात वडील रामू धनगरे याच्याविरुध्द मुलीला मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्याच हाती पडल्या बेड्या
प्रतीक्षा ही रोज भांडण करते, कामाला जात नाही, मोठ्या बहिणीबरोबर वाद घालते, तसेच मलाही शिव्या देत असल्याचा राग येऊन जंगलात नेऊन तिला फासावर लटकविण्याचा प्रयत्न केल्याचे संशयित रामू धनगरे याने कबूल केले. रामू हा मूळचा ओझरखेड, ता. त्र्यंबकेश्वर येथील रहिवासी असून, सध्या मजुरीसाठी मुंगसरे येथे भाड्याने खोली घेऊन राहत होता. त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती. मात्र, त्याची तीन मुले व रामू दुसरी महिला व तिच्या दोन मुलांसमवेत राहत होता. त्याचा मुलीला मारण्याचा प्रयत्न फसल्यानंतर त्याने नंतर अज्ञात इसमाने तिला पळवून नेल्याची फिर्याद दिली; परंतु पोलिसांनी खाक्या दाखविल्यानंतर फिर्यादीच आरोपी निघाला.

Web Title: As it was not working, the birth mother got up on the girl's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.